सांगली : पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी, हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक नुकतीच झाली. आज, सोमवारी (22 जानेवारी) साखर कारखान्याच्या अध्यक्षांची निवड होणार आहे. कारखान्याच्या अध्यक्षपदी हुतात्मा संकुलाचे नेते वैभव नायकवडी यांची निवड होते की वाळवा गावचे माजी सरपंच व हुतात्मा दूध संघाचे चेअरमन गौरव नायकवडी यांची वर्णी लागते, याविषयी सभासदांमध्ये उत्सुकता आहे.
कारखान्याच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीतून गौरव नायकवडी प्रचंड मताधिक्य घेऊन निवडून आले. त्यांची अध्यक्षपदी निवड करावी अशी अनेक सभासदांची मागणी आहे. युवा नेतृत्व म्हणून गौरव नायकवडी यांनाच पसंती मिळताना दिसत आहे. गौरव यांनी युवकांचे संघटन केले आहे, सामाजिक कार्याचा व सार्वजनिक कार्याचा त्यांना चांगला अनुभव आहे. दुसरीकडे डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत वैभवकाका नायकवडी यांनी वाळवा तालुक्यात हुतात्मा बँक, हुतात्मा बझार, हुतात्मा दूध संघ, पतसंस्था अशा विविध संस्थांतून सहकारामध्ये चांगले जाळे विणले आहे. त्यांनाच पुन्हा साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाची संधी मिळावी, अशी अनेक लोकांची मागणी आहे.