ब्रिसबेन (ऑस्ट्रेलिया) : चीनी मंडी ऑस्ट्रेलियातील साखरेचे कोठार मानल्या जाणाऱ्या नॉर्थ क्विन्सलँडमध्ये २०१८चा ऊस तोडणी हंगाम संपुष्टात आला आहे. हंगामात जवळपास ३०० लाख टन ऊस तोडणी झाली आहे. उसाला असणारा गोडवा हा क्विन्सलँडमधील ऊस उत्पादकांसाठी वरदान आहे. पण, त्यांना आता जागतिक बाजारपेठेतील साखरेच्या दरांशी सामना करावा लागत आहे.
राज्यातील २१ साखर कारखान्यामध्ये गाळप हंगाम संपला आहे. कोरड्या हवामानामुळे ऊस पिक कमी झाले असले, तरी गेल्या दहावर्षांतील सर्वाधिक साखर उतारा मिळाल्याचे सांगितले जात आहे.
ऑस्ट्रेलियन शुगर मिल्स कौन्सिलचे जिम क्रेन म्हणाले, ‘कोरड्या हवामानामुळे विशेषतः ऐन हिवाळ्यातील परिस्थितीमुळे अपेक्षेपेक्षा कमी ऊस उत्पादन झाल्याचे दिसत आहे. ऊस उत्पादनाचा अंतिम आकडा ३०५ लाख टनापर्यंत जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, साखरेच्या उताऱ्यावर मात्र अतिशय समाधानकारक स्थिती आहे. जवळपास १४.५ टक्के साखर उतारा मिळाला आहे. २००९पासूनचा हा सर्वांत चांगला उतारा आहे.’
राज्यात जरी २०१७ पेक्षा उसाचे पिक जवळपास १० लाख टनांनी कमी झाले असले तरी, कच्च्या साखरेचे उत्पादन गेल्या वर्षीच्या ४३ लाख टना इतकेच आहे. हर्बट रिवर ऊस उत्पादकांचे प्रमुख मायकेल पिसानो म्हणाले, ‘हंगाम गेल्या वर्षीच्या तुलनेत एक महिना लवकर संपला आहे. पण, हंगाम अतिशय चांगला झाला आहे. पावसाळी परिस्थितीमुळे काही ठिकाणी तोडणी थांबली आणि शेतकऱ्यांना ऊस तसाच सोडून द्यावा लागला. या आठवड्यात चांगला पाऊस झाल्यामुळे पुढच्या वर्षीच्या उत्पादनाकडे लक्ष लागलेल्या ऊस उत्पादकांसाठी ते चांगले ठरू शकते.’
तोडणी संपल्यानंतर आठवड्याभरातच चांगला पाऊस झाला आहे. या वर्षी कोरड्या हवामानाचा अनुभव आल्यामुळे हा पाऊस खूपच चांगला म्हणावा लागले, असे पिसानो यांनी म्हटले आहे.
ते म्हणाले, ‘राज्यात दोन वेळा पूर परिस्थिती पहायला मिळाली. त्याचा पिकावर म्हणावा तितका परिणाम झाला नाही आणि हंगाम अपेक्षेपेक्षा चांगला गेला. गेल्या वर्षी २१ डिसेंबरपर्यंत हंगाम चालला होता. पण, यंदा आम्ही एकही ऊस मागे न ठेवता चांगले व्यवस्थापन केले. साखरेचा उतारा चांगला आहे. ’
क्रेन म्हणाले, ‘गेल्या काही आठवड्यांत अवकाळी उष्मा पहायला मिळाला. त्याचा काही ठिकाणच्या उसावर परिणाम झाला. मध्य आणि दक्षिण प्रांतात झालेल्या पावसामुळे आगीचा धोका टळला असून, पुढच्या वर्षीच्या पिकासाठी ते अतिशय फायदेशीर ठरणार आहे. येत्या काही दिवसांत आणखी पावसाचा अंदाज असल्यामुळे पुढच्या वर्षीच्या पिकासाठी चांगली पायाभरणी होणार आहे.’
क्विन्सलँडमधील कारखाने आता कारखान्यातील दुरुस्ती आणि मेंटेनन्सकडे लक्ष देणार आहेत. दर वर्षी या कारखान्यांकडून हंगाम नसलेल्या काळात यासाठी २ हजार लाख डॉलरची गुंतवणूक केली जाते.