साखर सहसंचालकांच्या कारवाईनंतर हालचाल
कोल्हापूर, ता. 20 : साखर कारखाने सुरू होवून महिना होत आला. तरीही, जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी एफआरपीची रक्कम दिलेली नाही. प्रादेशिक साखर सहसंचालकांनी दिलेली नोटीस आणि त्यानंतर झालेल्या सुनावणीमुळे जिल्ह्यातील बहुतांशी साखर कारखाने एफआरपीची रक्कम देण्यासाठी शेतकऱ्यांच्या बॅंक आणि शाखा निहाय याद्या तयार करण्याच्या कामात गुंतले आहेत.
प्रादेशिक साखर सहसंचालकांनी दोन टप्प्यातमध्ये जिल्ह्यातील 29 सहकारी आणि खासगी कारखान्यांना नोटीस दिली आहे. पंधरा दिवसात एफआरपी देण्याचा कायदा आहे. ऊस तोड सुरू होवून महिना झाला तरीही, शेतकऱ्यांना उसाचे पैसे मिळालेले नाहीत. एकीकडे वेळेत ऊस तोड होत नाही. ऊस तोड झाली तर त्याचे पैसे वेळेत मिळत नाहीत. याबाबत वारंवार मोर्चे आणि आंदोलने होत आहेत. यापार्श्वभूमीवर प्रोदशिक साखर सहसंचालक सचिन रावल यांनी पहिल्या टप्प्यात कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील 14 साखर कारखान्यांना आणि त्यानंतर काल (बुधवार) कोल्हापूरमधील 15 साखर कारखान्यांना वेळेत एफआरपी न दिल्यामूळे नोटीस दिली आहे. दरम्यान, पहिल्या टप्प्यात ज्यांना नोटीस दिली आहे. त्या साखर कारखान्यांनी शेतकरी आणि सभासद निहाय उसाचे बिल वाटप याद्या तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. बॅंक, सहकारी सेवा संस्था व कारखाना पातळीवर या याद्या निश्चित करून एफआरपीची रक्कम एक रकमी दिली जाणार आहे. पंधरा-पंधरा दिवसांमध्ये ज्यांचा-ज्यांचा ऊस गाळप झाला आहे. त्यांना ही बिल दिली जाणार आहे.
654 कोटी थकीत
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील साख कारखान्यांकडून आत्तापर्यंतचे सुमारे 654 कोटी रुपये थकवले आहेत.