बरेली: कोरोनाच्या काळात शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मीरगंजच्या डीएसएम साखर कारखान्याने नवा प्रस्ताव तयार केला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या कुटुंबातील कोणीही सदस्य जर खासगी लॅबमध्ये तपासणी करू इच्छित असेल तर त्याचा निम्मा खर्च कारखाना करणार आहे. यासाठी कारखान्याने डॉ. लाल पॅथ लॅबशी करार केला आहे.
जिल्ह्यात सध्या मीरगंज साखर कारखान्याने ही सुविधा सुरू केली आहे. जिल्हा ऊस अधिकारी पी. एन. सिंह यांनी सांगितले की, लवकरच इतर साखर कारखानेही अशा प्रकारे सुविधा देण्याची तयारी करत आहेत. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर लोक खासगी लॅबच्या तपासण्यांचा खर्च सहन करू शकत नाहीत. त्यामुळे कारखान्याने ही सुविधा सुरू केली आहे. खासगी तपासणी लॅबच्या खर्चात सूट मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी स्थानिक ऊस अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. यापूर्वी साखर कारखान्यांनी परिसरात कोरोना संक्रमण रोखण्यासाठी सॅनिटायझरची सुविधा उपलब्ध करून दिली होती. याशिवाय विलगीकरण केंद्रे सुरू केली. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कोरोना संक्रमणापासून रोखण्यासाठी पुढील काळात आणखी सुविधा वाढविण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे जिल्हा ऊस अधिकाऱ्यांनी सांगितले. सॅनिटायझेशनच्या कामात गती आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले.