कोल्हापूर : जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांचा गळीत हंगाम चार महिने तर मोजक्या कारखान्यांचा हंगाम साडेचार महिन्यांत आटोपला आहे. तोडणी टोळ्यांची संख्या घटल्याने ऊस तोडणी मजूर, वाहतूक कंत्राटदारांना पुरेसे काम मिळाले. तर शेती, केन यार्ड, उत्पादन खात्यातील हंगामी कर्मचाऱ्यांना फटका बसल्याचे चित्र दिसून येत आहे. शेती, केन यार्ड व हंगामी कर्मचाऱ्यांना ३० ते ५२ टक्क्यांपर्यंत रिटेन्शन अलाऊन्स दिला जातो; मात्र हंगाम अल्पावधीत संपल्यामुळे त्यांचे वार्षिक आर्थिक गणित बिघडल्याची चर्चा होत आहे.
यंदा जिल्ह्यात ऑक्टोबर अखेरीस ऊस तोडणी टोळ्या आल्या. मात्र, आंदोलनामुळे २३ नोव्हेंबरपर्यंत कारखाने सुरू झाले नाहीत. त्यामुळे टोळ्या कर्नाटकाकडे वळल्या. नंतर हंगाम सुरू झाल्यावर बहुतांश टोळ्या आल्याच नाहीत. उपलब्ध टोळ्यांना ऊस तोडणीचे भरपूर काम मिळाले. मजुरांना ऊस तोडणी दरात ३४ टक्के व मुकादम कमिशनमध्ये एक टक्का वाढही मिळाली. तुलनेने साखर कारखान्यांतील हंगामी कामगारांचे नुकसान झाले आहे. तोडणी मजुरांच्या एका टोळीने हंगामात १००० ते २५०० टन ऊसाची तोडणी केली.