उद्या ऊस परिषदेत केला जाणार निर्धार
कोल्हापूर, ता. 9 : यावर्षीच्या गळीत हंगामात उसाला पहिली उचल 3 हजार 500 रुपये विनाकपात मिळावे. एफआरपी देताना एक रक्कमीच मिळाली पाहिजे. गेल्यावर्षीच्या हप्त्यातील उर्वरित प्रतिटन 200 रुपये तत्काळ मिळावेत. भुजल अधिनियमाच्या जाचक अटीतून शेतकऱ्यांची मुक्तता झालीच पाहिजे. शेतकऱ्यांची संपूर्ण वीजबील माफ झालेचे पाहिजे. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे, या मागणीसाठी उद्या ता. 10 ( बुधवार) दसरा चौक येथील राजर्षि शाहू स्मारक भवन येथे रघुनाथदादा प्रणित शेतकरी संघटनेच्यावतीने ऊस परिषद घेतली जाणार आहे.
परिषदेसाठी संघटनेच्यावतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्यावर्षी शेतकऱ्यांना पहिला हप्ता म्हणून एफआरपी अधिक 200 रुपये देण्याची घोषणा झाली होती. मात्र, या घोषणेला कोणीही बांधिल राहिले नाही. त्यामुळे यावर्षी पहिला हप्ता 3500 रुपये तो ही विना कपात घेण्याचा निर्धार केला जाणार आहे. यावर्षी एफआरपीची मोडतोड केली जाणार आहे. हे कधीही खपवून घेतले जाणार नाही. शेतकऱ्यांना साखर कारखान्यांकडून एक रक्कमी आणि चौदा दिवसातच एफआरपीसह पहिला हप्ता मिळाला पाहिजे. अशीही मागणी केली आहे. या प्रमुख मागणीसह इतर मागण्याही केल्या जाणार आहे.