पंचगंगा कारखान्याची पहिली उचल २८५० रुपये : चेअरमन प्रभाकर शिंदे

छत्रपती संभाजीनगर : नेवासा, गंगापूर, वैजापूर तालुक्याला वरदान ठरलेल्या पंचगंगा शुगर अॅण्ड पॉवर प्रा.लि. (महालगाव) साखर कारखाना नव्याने सुरू झालेला असतानाही पहिल्या गळीत हंगामात शेतकऱ्यांच्या उसाला पहिली उचल प्रतिटन २८५० रुपये देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पहिल्या पंधरवड्यात गळितास आलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच पेमेंट जमा होणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन पंचगंगा उद्योग समूहाचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी दिली.

शिंदे म्हणाले की, आमच्या या कारखान्याचे हे पहिले वर्ष आहे तरीही पहिल्या पंधरवड्यात कारखान्याने ५० हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केलेले असून, छत्रपती संभाजीनगर विभागात चालू गळीत हंगामात २८५० रुपये पहिली उचल देणारा पंचगंगा हा पहिला कारखाना ठरला आहे. या कारखान्यास जास्तीत-जास्त ऊस पुरवठा करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले आहे.

शेतकऱ्यांना चांगला दर देण्यासाठी केंद्र सरकारने साखरेची एमएसपी वाढविण्याची मागणी करताना चेअरमन शिंदे म्हणाले की, तोडणी वाहतूक खर्च ९०० ते १००० रुपये प्रतिटनावर पोहोचलेला आहे. त्यामुळे केवळ इथेनॉल व विजेचे पैसे मिळवून चालणार नाही तर मुख्य उत्पादन असलेल्या साखरेला चांगला दर मिळण्यासाठी ४००० रुपये एमएसपी (किमान विक्री मूल्य) दर हवेत, असे मत व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here