मुंबई दिनांक २२: वंदेभारत अभियानांतर्गत विविध देशातून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांचा ओघ सुरुच असून आतापर्यंत १०५ विमानांनी तब्बल १६ हजार २३४ प्रवासी मुंबईत दाखल झाले आहेत. यामध्ये मुंबईचे प्रवासी ६००९, उर्वरित महाराष्ट्रातील प्रवासी ५३८९ आणि इतर राज्यातील प्रवासी ४८३६ आहेत.
दिनांक १ जुलै २०२० पर्यंत आणखी ४९ विमानांनी प्रवासी मुंबईत दाखल होणार आहेत.
आतापर्यंत ब्रिटन, सिंगापूर, फिलीपाईन्स, अमेरिका, बांगलादेश, मलेशिया, कुवेत, इथियोपिया, अफगाणिस्तान, ओमान, दक्षिण अफ्रिका, इंडोनेशिया, नेदरलँड, जपान, श्रीलंका, म्यानमार, टांझानिया, स्पेन, आर्यलँड, कतार, हाँगकाँग, कझाकीस्तान, मॉरिशियस, ब्राझील, थायलंड, केनिया, मियामी, व्हियतनाम, इटली, स्वीडन, इथोपिया, रोम, जर्मनी, दुबई, मालावी, वेस्ट इंडिज, नॉर्वे, कैरो, युक्रेन, रशिया, मादागास्कर, नायजेरिया, ऑस्ट्रेलिया अशा विविध देशातून प्रवासी मुंबईत दाखल झाले आहेत.
मुंबईतील प्रवाशांची संस्थात्मक कॉरंटाईनची सुविधा विविध हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. इतर जिल्ह्यातील व राज्यातील प्रवाशांना त्यांच्या जिल्हा मुख्यालयी पाठवण्याची व्यवस्था जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर यांच्यामार्फत करण्यात येत आहे. या प्रवाशांना त्यांच्या जिल्हा मुख्यालयी गेल्यानंतर संबंधित जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांमार्फत कॉरंटाईन केले जात आहे.
इतर राज्यातील प्रवाशांचे वाहतूक पासेस संबंधित राज्याकडून प्राप्त होईपर्यंत त्यांना मुंबईत कॉरंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात येते व त्या प्रवाशांचा प्रवासी वाहतूक पास संबंधित राज्याकडून प्राप्त होताच त्यांना त्यांच्या राज्यात पाठविण्यात येत आहे.
हे अभियान केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालय, विदेश मंत्रालय व केंद्रीय गृह मंत्रालय यांच्या समन्वयाने महाराष्ट्र शासन यशस्वीरित्या पार पाडत आहे.
Audio Playerहि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.