साखरेचे दरात घसरण सुरूच :
कोल्हापूर, ता. 16 : यावर्षीच्या गळीत हंगामात एक रकमी एफआरपी देण्याचा निर्णय घेवून साखर कारखान्यांची धुराडे पेटली आहेत. मात्र, कायद्याने चौदा दिवसात द्यावी लागणारी एफआरपीची रक्कम किती दिवसात मिळणार याची चर्चा झाली नाही. त्यानूसार चौदा दिवसानंतरच एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांच्या पदरात पडणार आहे.
यावर्षीच्या गळीत हंगामात प्रतिटन उसाला एफआरपी अधिक 200 रुपये मिळावेत अशी भूमिका विविध संघटना आणि पक्षांनी घेतली. यामध्ये एक रकमी एफआरपी आणि भविष्यात साखरेला दर मिळाला तर प्रतिटन 200 रुपये देण्याची भूमिका घेवून कारखाने सुरू झाले. आता ही एफआरपी किती दिवसात देणार यावर मात्र चर्चा झालेली नाही. दरम्यान, सध्या बाजारात प्रतिक्विंटल साखरेचे दर 3000 ते 3100 रुपयांपर्यंत आहेत. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात प्रतिटन 2800 ते 3050 रुपयांपर्यंत एफआरपी द्यावी लागते. ही एफआरपी चौदा दिवसात देणे अवघड झाले आहे. सध्या तोडल्या जाणाऱ्या उसासाठी किमान 20 ते 25 दिवसानंतरच एफआरपी मिळू शकते. असे चित्र आहे. त्यामुळे साखर कारखान्यांना पुन्हा एकदा आंदोलनाच्या पवित्र्याला सामोरी जावे लागणार आहे.