कोल्हापूर : हरळी येथील आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. प्रकाश शहापूरकर यांनी कामगारांना डिसेंबर २०२४ नंतर पगाराची तरतूद आणि २०२७ अखेर कारखाना नफ्यात आल्यानंतर थकीत पगार देण्याचा प्रस्ताव दिला. हा प्रस्ताव धुडकावून कामगारांनी पुन्हा पुन्हा आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. थकीत पीएफ भरणे आणि पगाराबाबत तीव्र आंदोलनाचा इशारा साखर कामगार संघाने प्रसिद्धी पत्रकातून दिला आहे.
साखर कामगार संघाचे अध्यक्ष विजय रेडेकर, उपाध्यक्ष श्रीकांत नार्वेकर, सहसचिव अरुण शेरेगार, सुरेश कब्बुरे यांच्यासह सदस्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कारखान्याचे अध्यक्ष शहापूरकर यांनी २८ मे रोजी बैठकीत कामगारांना अहमदाबाद येथील स्वामी नारायण ट्रस्टकडून कारखान्याला ३०० कोटींचे कर्ज मंजूर झाल्याचे सांगितले. त्या रकमेच्या विनियोगाचा उहापोह केला. परंतु, त्यात कामगारांच्या पगाराबाबत कोणताही उल्लेख नव्हता. त्यामुळे कामगार बैठकीतून निघून गेले. कामगारांना जुलै २०२३ पासून ६० टक्के पगार दिला आहे. साखर विक्री सुरू करून ४० टक्के पगार अदा केला जाईल, असे सांगितले आहे. मात्र, अध्यक्ष व संचालक मंडळ पगाराबाबत चर्चेला तयार नाहीत. त्यामुळे कामगारांकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.