परभणी : ऊसतोड कामगार कल्याण मंडळाचे महाव्यवस्थापक दिनेश डाके यांनी सोनपेठ, गंगाखेड तालुक्यातील ऊस तोडणी कामगारांच्या मुलांसाठी प्रस्तावित वसतिगृहांच्या इमारतींची पाहणी केली. त्यांनी उसतोड मजुरांशी संवाद साधून मुलांना वसतिगृहात प्रवेश घ्यावा, असे आवाहन यावेळी केले. यावेळी समाज कल्याण निरीक्षक ए. एम. श्रीमणवार, गृहपाल व्ही.डी. परभणीकर, अमृत मुंढे, विष्णू बेटकर आदींची उपस्थिती होती.
दरवर्षी ऊसतोड हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात कामगार स्थलांतरित होतात. अनेकदा त्यांची मुलेही स्थलांतरित होतात. त्यामुळे त्यांचे शिक्षण अर्धवट राहते. मुलांच्या शाळेतील गळतीचे प्रमाण रोखण्यासाठी आणि ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी शासनाने संत भगवान बाबा शासकीय वसतिगृह योजना सुरू केली आहे. योजनेअंतर्गत ६ वसतिगृहांना मंजुरी मिळाली आहे. यात गंगाखेड, सोनपेठ, पालम या तीन तालुक्यांचा समावेश आहे. त्यासाठी सामाजिक न्याय व विशेष विभागाकडून जागेचा शोध घेतला जात आहे.