फगवाडा : फगवाडा साखर कारखान्याकडून ऊसाची थकीत रक्कम न मिळाल्याने आंदोलन करीत असलेल्या शेतकरी संघटनांकडून दिल्ली-अमृतसर राष्ट्रीय महामार्गावरील साखर कारखाना चौकात सुरू केलेल्या बेमुदत धरणे आंदोलनासमोर सरकारला झुकावे लागले. दुपारनंतर राज्य सरकारने ऊस उत्पादकांसाठी १०० कोटी रुपये जारी करण्याची घोषणा केली. यापूर्वी एक दिवस आधी, लुधियाना-जालंधर तथा जालंधर-लुधियाना नॅशनल हायवेसह फगवाडातील नकोदर व फगवाडाकडून होशियारपूरकडे जाणारे रस्ते शेतकऱ्यांनी अडवले. त्यामुळे लोकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला.
जागरणमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, भारतीय किसान युनियनने (दोआबा) मंगळवारपासून सतत साखर कारखान्यासमोर चौकात आंदोलन सुरू ठेवले होते. शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग बंद केला. फक्त रक्षाबंधनासाठी शेतकऱ्यांनी हायवे काही काळ खुला केला. शुक्रवारी सकाळी पुन्हा शेतकऱ्यांनी नॅशनल हायवेसह होशियारपूर आणि नकोदरकडे जाणाऱ्या रस्त्यावर ठाण मांडले. पोलीस, प्रशासनाने त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, साखर कारखान्याकडून ७२ कोटी रुपयांची थकबाकी मिळविण्याबाबत शेतकरी ठाम राहीले. यापूर्वी मुख्यमंत्री भगवंत मान आणि पंचायत कॅबिनेट मंत्री कुलदीप धालीवाल यांच्यासोबत झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांच्या अनेक मागण्या मान यांनी मंजूर केल्या होत्या. मात्र, शेतकऱ्यांमध्ये फगवाडा कारखान्याकडील थकीत रकमेबाबत रोष होता.