पुणे : “एकीकडे कमी ऊस गाळपामुळे उत्पादन खर्च वाढून कारखाने आर्थिक अडचणीत येत आहेत तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात खासगी कारखान्यांना व त्यांच्या विस्तारीकरणाला परवानगी मिळत आहे. साखर कारखानदारीच्या खासगीकरणास शासनच जबाबदार आहे,” असे परखड मत ‘नीरा भीमा’चे अध्यक्ष लालासाहेब पवार यांनी व्यक्त केले. सोमेश्वर कारखान्याच्या शिक्षण संकुलामध्ये राष्ट्रीय सहकारी संघ (नवी दिल्ली) व महाराष्ट्र राज्य सहकारी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लिडरशीप डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत संचालक प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन केले होते. त्याचे उद्घाटन सोमेश्वरचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी लालासाहेब पवार होते.
जितके जास्त गाळप तितका उत्पादन खर्च कमी आणि जितके कमी गाळप तितका उत्पादन खर्च जास्त हे कारखानदारीचे सूत्र आहे. हंगाम किमान दीडशे दिवस चालायला हवा. याचसाठी शेतकऱ्यांनी आपापल्या कारखान्यालाच ऊस घातला पाहिजे अन्यथा आर्थिक सूत्र बिघडेल, असे मत पुरुषोत्तम जगताप व लालासाहेब पवार यांनी मांडले.
याप्रसंगी ‘नीरा-भीमा’चे माजी उपाध्यक्ष विलास वाघमोडे, ‘पांडुरंग’ चे कार्यकारी संबालक डॉ. यशवंत कुलकर्णी, ‘सोमेश्वर’ चे कार्यकारी संचालक राजेंद्र यादव, ‘सोमेश्वर’चे ज्येष्ठ संचालक विश्वास जगताप, शांताराम कापरे, शैलेश रासकर, लक्ष्मण गोफणे, अभिजित काकडे, ऋषी गायकवाड, हरिभाऊ भोंडवे, जितेंद्र निगडे, रणजित मोरे, अनंत तांबे, किसन तांबे कालिदास निकम, योगिराज नांदखिले, विराज निंबाळकर, बापूराव गायकवाड, संजय नेवसे उपस्थित होते. सहकारी संघाचे मुख्याधिकारी प्रदीप मुळूक यांनी प्रास्ताविक केले. ‘सोमेश्वर ‘चे उपाध्यक्ष बाळासाहेब कामथे यांनी आभार मानले.
साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.