वाघळवाडी : सामेश्वरनगर (ता. बारामती) येथे पुणे जिल्हा साखर कामगार मेळावा पार पडला. यावेळी साखर कामागरांसाठी सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी, त्रिस्तरीय समितीची नेमणूक, कामगारांचे थकीत पगार, रोजंदारीचे प्रश्न अशा प्रलंबित प्रश्नांकडे राज्य सरकारने लक्ष द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे यांनी केली.
यावेळी मंडळाचे सरचिटणीस शंकरराव भोसले म्हणाले, सध्या राज्यातील साखर कामगारांची अवस्था दयनिय झाली असून, पगारवाढीचा करार संपला आहे. साखर आयुक्तालयावर काढलेल्या मोर्चात आमच्या मागण्यांची दखल घेतली नाही. राज्यातील साखर कामगारांचे अजूनही 450 ते 500 कोटी रुपये कारखानदारांकडे थकले आहेत आणि सरकार या गोष्टींकडे लक्ष देत नाही. ऊस उत्पादकांसाठी , ज्या प्रकारे एफआरपी देण्यासाठी वेगळा निधी उपलब्ध केला जातो, त्याप्रकारे साखर कामगारांचे पगार देण्यासाठी वेगळ्या निधीची तरतूद करण्यात यावी. केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे साखर उद्योग अडचणीत गेल्याची टीका त्यांनी केली.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.