सांगली : भारताने २० % इथेनॉल मिश्रणाच्या धोरणात सहभाग घेताना कच्चा माल म्हणून जो मका वापरला जाणारा आहे, तो भारतातच पिकवावा. भारतासारख्या कृषी प्रधान देशात अमेरिकेतून मका आयात करण्याची काय गरज आहे? जर आपल्या देशातील शेतकऱ्यांना मका उत्पादनासाठी प्रोत्साहन दिले तर हे शक्य आहे. त्यासाठी लागेल ते सहकार्य शासनाने द्यावे, असे मत आमदार अरुणअण्णा लाड यांनी व्यक्त केले. शासनाच्या आयात निर्यात धोरणावर आधारित चर्चासत्रात ते बोलत होते.
आ. लाड म्हणाले की, भारतात अन्न धान्यापासून इथेनॉल निर्मितीला बळ देण्यासाठी अमेरिकेतील शिष्टमंडळ दिल्ली येथे परराष्ट्र मंत्र्यांना भेटले. त्यामुळे भारताच्या या इथेनॉल मिश्रणाच्या धोरणात अमेरिकेलाही संधी निर्माण झाली. अमेरिका आवश्यक तेवढा मका भारताला देऊ शकते. त्यामुळे भारताने या निर्णयाला गती द्यावी, मका आयात करावा, असे अमेरिकेने सुचवले आहे. पण हा मका भारतातच पिकवावा. भारत सरकारने मक्यापासून, धान्यापासून इथेनॉल निर्मिती जरूर करावी पण त्यासाठीचा कच्चा माल मका हा इतर देशाकडून न घेता आपल्याच देशात पिकवण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. इतर देशांना इथेनॉल मिश्रणाची संधी न देता आपल्या देशातील शेतकऱ्यांसाठी चालून आलेल्या संधीचे सोने करण्यासाठी एक पाऊल शासनाने उचलावे.