बीड : केवळ साखर उत्पादन करून शेतकऱ्यांना उसाची एफआरपी देणे शक्य नाही. त्यामुळे केंद्र शासनाने इथेनॉल निर्मितीवर घातलेल्या बंदी निर्णयाचा फेरविचार करून ही बंदी मागे घ्यावी, अशी मागणी राज्य साखर संघाचे उपाध्यक्ष तथा लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक आ. प्रकाश सोळंके यांनी केली. कारखान्याच्या ३२ व्या उस गाळप हंगाम सांगता समारंभात ते बोलत होते. तेलगाव येथील या कारखान्याच्या हंगामाचा सांगता समारंभ शनिवारी मार्च रोजी झाला.
आ. प्रकाश सोळंके यांच्या हस्ते विधीवत गव्हाण पूजन करून या ऊस गळीत हंगामाची सांगता करण्यात आला. ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाडी चालक, ट्रक. मिनी ट्रॅक्टर चालक यांच्या उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कारखान्याने एकूण १६८ दिवसांमध्ये ६.४५ लाख मे. टन उसाचे गाळप करून सरासरी १०.२९ टक्के साखर उताऱ्याने ४.९७ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले. एकूण १.७० कोटी लिटर्स इथेनॉलचे उत्पादन घेऊन ३.५८.७१. ६०० युनिट वीज राज्य वीज वितरण कंपनीस निर्यात केली आहे असे यावेळी सांगण्यात आले. कार्यकारी संचालक आर. सी. बडगुजर व सर्व खाते उपखातेप्रमुख, कर्मचारी आणि कामगार उपस्थित होते. संचालक छगनराव जाधव यांनी आभार मानले.