शाहाबाद मारकंडा : हरियाणा सरकारने हंगाम २०२२-२३ मधील साखर कारखान्यांच्या गाळपास एक नोव्हेंबरपासून सुरुवात करावी अशी मागणी भारतीय किसान युनियन चढनीचे राष्ट्रीय अध्यक्ष गुरनाम सिंह चढनी यांनी केली. लवकर गाळप सुरू झाले तर शेतकरी आपला ऊस तोडून त्यामध्ये गव्हाचे पिक घेऊ शकतात. हा कालावधी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. याबाबत शेतकरी संघटनेचे नेते चढनी म्हणाले की, साखर कारखान्यांमध्ये असलेल्या सहवीज प्रकल्पांमध्ये पाचटाचा वापर करण्याची गरज आहे.
दैनिक ट्रिब्यूनमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, सरकारने पाचटाचा वापर सुरू केल्यास पाचट जाळण्याची समस्या संपुष्टात येईल. तसेच कोळशाचा साठाही शिल्लक राहू शकेल. एक एकर ऊसातील पाचटापासून जवळपास ८०० युनिट विजेचे उत्पादन होऊ शकते, असे चढनी यांनी सांगितले. यातून कोळशाची मोठ्या प्रमाणात बचत होईल. एक क्विंटल पाचटापासून २५ युनिट विजनिर्मिती होते. यातून पाचट जाळण्याच्या समस्येची सोडवणूक होईल. दरम्यान, आतापर्यंत ऊस दरवाढ न झाल्याबद्दल चढूनी यांनी चिंता व्यक्त केली. हरियाणा सरकारने आपली परंपरा कायम राखताना पंजाब आणि युपीच्या तुलनेत शेतकऱ्यांना प्रती क्विंटल ४० रुपये दरवाढ द्यावी अशी मागणी त्यांनी केली.