पाटणा : यंदाच्या हंगामात रीगा साखर कारखाना सुरू झालेला नाही. त्यामुळे या विभागातील शेकडो एकर क्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यांना दिलासा देण्यासाठी ऊस उद्योग विभागाने पावले उचलली आहेत. रीगा साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस नेणाऱ्या कारखान्याला राज्य सरकार अनुदान देणार आहे.
याबाबत लाइव्ह हिंदुस्थान डॉट कॉमवर प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, ऊस उद्योग विभागाने रीगा साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस खरेदी केंद्रांकडून गाळपासाठी ऊस नेणाऱ्या कारखान्यांना प्रती क्विंटल ४५ पैसे प्रती किलोमीटर अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एक क्विंटल ऊस एक किलोमीटर नेल्यास सरकारकडून ४५ पैसे अनुदान मिळेल. राज्य सरकारकडून सुगौलीच्या एचपीसीएल बायोफ्युएल्स लिमिटेड, गोपालगंजमधील सिधवलियाची मगध शुगर एनर्जी लिमिटेड आणि समस्तीपुरची हसनपूर शुगर मिल्स यांना रीगा कारखान्याचा ऊस खरेदी करण्यास नियुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांच्या ऊसाला योग्य दर मिळणार आहे.