पाकिस्तानमधील आर्थिक संकटादरम्यान, जनतेसमोरील अडचणी कमी होण्यास तयार नाहीत. लोकांवर वारंवार नवा बोजा पडत आहे. कंगाल देशात महागाईचा दर ३५ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. तर आता पाकिस्तानच्या केंद्रीय बँकेने व्याज दरात मोठी वाढ करताना जनतेचा ईएमआय वाढवला आहे. बेंचमार्क व्याज दरात १०० आधार आकडेवारी म्हणजे १ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. हा दर आता २१ टक्क्यांवर पोहोचला आहे.
आजतकमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, केंद्रीय बँकेने बेंचमार्क दरात वाढ केल्यानंतर आता देशातील सर्व बँका आपल्या कर्जाच्या व्याजदरात वाढ करतील. त्यामुळे लोकांवर परिणाम होईल असे रॉयटर्सच्या वृत्तामध्ये म्हटले आहे. त्यामुळे लोकांना आता जादा ईएमआय भरावा लागेल. पाकिस्तानमध्ये व्याज दरवाढ केली जावू शकते असे म्हटले जात आहे. एक्स्पर्ट्सनी २०० बेसीस पॉईंट्स वाढीची शक्यता वर्तवली होती. आजच्या दरवाढीनंतर होम लोन, कार लोन आणि पर्सनल लोनसह सर्व कर्जे महागतील.
पाकिस्तानमध्ये महागाईचा दर ३५.४ टक्के आहे. गेल्या पाच दशकात हा महागाईचा सर्वाधिक दर आहे. त्यामुळे लोकांच्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. आट्यापासून पेट्रोल, डिझेलपर्यंत सर्व वस्तूंच्या महाग दरामुळे सर्वसामान्य नागरिक वैतागले आहेत. या आर्थिक संकटातून मार्ग काढण्याचा प्रयत्न अपुरा ठरला आहे.