पुणे : चीनी मंडी
महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांमध्ये सध्या दुष्काळा सदृश्य स्थिती असली, तरी राज्यात यंदाच्या खरीप हंगामात गेल्या १८ वर्षांतील सर्वांत जास्त ऊस लागवड झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. नाबार्डकडून पुरवण्यात आलेल्या माहितीवरून हा आकडा समोर आला आहे.
नॅशनल बँक फॉर अॅग्रीकल्चरल अँड रुरल डेव्हलपमेंट (नाबार्ड) यांच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्रात २०१९-२० च्या गाळप हंगामातही रेकॉर्डब्रेक ऊस उत्पादन पहायला मिळणार आहे. राज्यात हंगामापूर्वी लागवड केली असेल,तर उसाला सरासरी २०६.३० सेंटीमीटर पाणी लागते. पण, ज्या भागात कमी पाऊस आहे, त्या भागात जुलै-ऑगस्टमध्ये ऊस लागवड होते. त्या पिकाला २४३.८० सेंटीमीटर पाणी लागते. जवळपास १८ महिने उसाचे पिक शेतांमध्ये असते. नाबार्डकडून मिळालेल्या डेटानुसार राज्यात सर्वाधिक पाणी लागणाऱ्या ऊस आणि भाताची लागवड मोठ्या प्रमाणावर झाली आहे. किंबहुना महाराष्ट्रात सातत्याने येणाऱ्या पाणी टंचाईला ही पिक पद्धतीच जबाबदार असल्याचे मानले जात आहे.
गेल्या वर्षी (२०१७) राज्यात ९.०२ लाख हेक्टर क्षेत्रात ऊस लागवड झाली होती. तर, या वर्षी ११.६३ लाख हेक्टर क्षेत्रात ऊस लागवड झाली आहे. गेल्या वर्षी राज्यातील ऊस उत्पादन ८१३.३४ लाख टन होते, तर २०१८मध्ये त्यात वाढ होत असून, उत्पादन ९२७.२० टक्क्यांच्या आसपास होणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी आपली पिक पद्धती बदलली पाहिजे, त्यांनी डाळी, ज्वारी, बाजरी या कमी पाणी लागणाऱ्या पिकांकडे वळायला हवे, असे मत कृषी विभागातील सूत्रांनी व्यक्त केले.
उसाची लागवड करू नका, असा दबाव आपण शेतकऱ्यांवर आणू शकत नाही. पण, उसाला पाणी जास्त लागते, याची त्यांना जाणीव होणे गरजेचे आहे. कारण, आपण खूप वर्षे अशी शेती करू शकणार नाही. महाराष्ट्राचे पावसाचे चक्र पाहिले, तर दहा वर्षांत काही भागांत खूप मोठ्या दुष्काळाला सामोरे जावे लागते. या स्थितीचा स्वीकार करायला हवा, असे मत एका कृषी अधिकाऱ्याने व्यक्त केले.
पाण्याची टंचाई असताना, शेतीच्या उत्पन्नात घसरण होऊ नये आणि शेतकऱ्यांना एक संरक्षित सिंचन मिळावे, यासाठी जलयुक्त शिवारसारख्या योजना सुरू करण्यात आल्या आहेत. या योजनेतून स्थानिक पातळीवर शेतीसाठी जास्तीत जास्त पाणी साठवून ठेवण्यात येते, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्याने दिली.
ते म्हणाले, ‘महाराष्ट्रातील ज्वारी, बाजरीसारख्या पारंपरिक पिकांना कमी पाणी लागते. पण, अशा पिकांचे क्षेत्र गेल्या काही वर्षांत झपाट्याने घसरले आहे. आपण, शेतकऱ्यांवर दबाव आणून त्यांना उसापासून इतर पिकांकडे वळवू शकत नाही. आपण, सध्या इतर पिकांबाबत माहिती देऊ लागलो आहे. विशेषतः राज्यात ज्वारीचे क्षेत्र वाढवण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.’
राज्यात जून आणि जुलैमध्ये चांगला पाऊस झाला. मान्सून पुढच्या काळातही तसाच राहील, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर ऊस लागवड केली. पण, ऑगस्टमध्ये केवळ १० ते १५ टक्के पाऊस झाला आणि सप्टेंबर तर पूर्णपणे कोरडा गेला. राज्य सरकारने ठिबक सिंचनासाठी कर्ज रुपाने अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. पण, राज्यात केवळ ३० ते ४० टक्के शेतकऱ्यांनीच आतापर्यंत ठिबक सिंचन सुरू केल्याची माहिती कृषी विभागातील तज्ज्ञांनी दिली.