नवी दिल्ली : देशात कोरोना विषाणूचा फैलाव गतीने होत आहे. गेल्या २४ तासांत देशभरात ५९,११८ नवे रुग्ण आढळले आहेत. ऑक्टोबर २०२० नंतर आतापर्यंत ही संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या आता १,१८,४६,६५२ वर पोहोचली आहे.
गेल्या दोन आठवड्यांत कोरोना रुग्णसंख्या वेगाने वाढत आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, नव्या रुग्णांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्र आणि पंजाबात आहे. देशात कोविड १९ च्या रुग्णांची संख्या पाहता केंद्र सरकार सातत्याने राज्य सरकारांशी आणि केंद्रशासीत प्रदेशांशी संपर्क ठेवून आहे. या कालावधीत २५७ रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. त्यामुळे कोरोनाने एकूण मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या १,६०,९४९ झाली आहे. देशभरात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या ४,२१,०६६ वर पोहोचली आहे. एका दिवसात ३२,९८७ लोक बरे होऊन घरी पोहोचले आहेत. त्यामुळे कोरोनातून बरे झालेल्यांची संख्या १,१२,६४,६३७ वर पोहोचली आहे.
देशात १६ जानेवारीपासून सामूहीक लसीकरण अभियान सुरू आहे. याअंतर्गत आतापर्यंत ५.५५ कोटी कोरोना व्हॅक्सिन देण्यात आले आहे. सरकारने एक एप्रिलपासून ४५ वर्षावरील लोकांनाही लस देण्याची घोषणा केली आहे.