कोल्हापूर : चंदगड तालुक्यातील राजगोळी खुर्द येथील ओलम शुगर्स साखर कारखान्याकडे चालू गळीत हंगामात गाळपास येणाऱ्या उसाला विनाकपात एकरकमी प्रती टन ३,१४४ रुपये दर देण्याचा निर्णय घेतला आहे. कारखान्याचे बिझनेस हेड भरत कुंडल यांनी ही माहिती दिली. तालुक्यात सर्वाधिक एफआरपी देणारा कारखाना म्हणून ओलम शुगर्सकडे पाहिले जाते. यापूर्वी गाळप झालेल्या उसाचे फरक बिल लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर जमा केले जाईल, असेही कुंडल म्हणाले.
बिझनेस हेड भरत कुंडल यांनी सांगितले की, कारखान्याने अवघ्या ६० दिवसांत २ लाख ८१ हजार ६०० मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे. ऊस दराबाबत ओलमने कधीही तडजोड केलेली नाही. हंगामाच्या सुरुवातीलाच प्रती टन ३,१०० रुपये दर जाहीर केला होता. कोल्हापूर येथील ऊस दराच्या बैठकीत १०० रुपये जादा देण्याचा निर्णय झाला. ओलमची एफआरपी ३,०४४ होती. त्यावर १०० रुपये जादा असे रुपये ३,१४४ रुपये दर देण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी ३१०० रुपये टन अशी बिले दिली आहेत. उर्वरीत ४४ रुपयांचा फरकही दिला जाईल.