अहमदनगर : श्रीगोंद्यातील हिरडगाव येथील गौरी शुगर (साईकृपा) उसाला पहिला हप्ता 3,106 रुपये दिला आहे. भाजप आमदार बबनराव पाचुपते यांनी सुरू केलेला हा कारखाना काही कारणामुळे अडचणीत आला होता. आता हा कारखाना उद्योजक बाबूराव बोत्रे यांनी घेतला आहे. बोत्रे यांनी 3,106 रुपये दर जाहीर केल्याने श्रीगोंद्यातील स्थानिक नागवडे आणि कुकडी कारखान्यांकडून ऊस उत्पादक शेतकरी आणि सभासदांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. ‘नागवडे’ने 2,500 रुपये, तर ‘कुकडी’ने 2,600 रुपयांची पहिली उचल दिली आहे. ‘गौरी’ने दिलेल्या तीन हजार रुपयांच्या दर नगर जिल्ह्यातील इतर साखर कारखान्यांपेक्षा जास्त आहे.
उद्योजक बाबूराव बोत्रे यांना नगर जिल्ह्यासह सोलापूर, लातूर, कोल्हापूर, उमरगा येथील कारखाना चालवण्याचा मोठा अनुभव आहे. पहिली उचल शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा होणार असल्याची माहिती गौरी कारखान्याच्या व्यवस्थापनाकडून देण्यात आली. या कारखान्याने श्रीगोंद्यासह राहुरी, कर्जत, जामखेड, जुन्नर, आष्टी, शिरूर, आळेफाटा भागातील उसासाठी फिल्डिंग लावली आहे.’गौरी’चे यंदाचे नऊ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट असल्याचे सांगण्यात आले.