सातारा : अखेर कराड उत्तरमधील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याने ऊस दराची कोंडी फोडली. या गळीत हंगामात ३१०० रुपये रुपयांचा पहिला हप्ता देऊन सर्वात जास्त उच्चांकी दर देणारा ठरला आहे. गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात सहकारी, खासगी कारखानदार आणि शेतकरी संघटनांचे पदाधिकारी यांच्यामध्ये एकत्र बैठक झाली. यावेळी सह्याद्री कार्यक्षेत्रातील शेतकरी सभासद जल्लोष व्यक्त करत आमदार बाळासाहेब पाटील यांना धन्यवाद दिले.
सह्याद्री कारखान्याने बैठकीत घेतलेल्या भूमिकेवर सर्वांनी शिक्कामोर्तब केले. या निर्णयाने कारखान्याने शेतकऱ्यांबरोबरच जिल्ह्यातील साखर कारखानदारीला मोठा दिलासा दिला आहे. एफआरपीप्रमाणे ऊस दराबाबत योग्य तोडगा निघावा, म्हणून अनेकजण प्रयत्नशील होते. एफआरपी प्रकरणी तोडगा काढण्यासाठी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांच्यासमवेत जिल्ह्यातील सहकारी कारखाने, खासगी कारखाने, त्यांचे कार्यकारी संचालक आणि विविध शेतकरी संघटनांचे पदाधिकाऱ्यांची एकत्रित बैठक झाली. यावेळी सर्व कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. उच्चांकी दर दिल्याबद्दल कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.