पुणे : पाटस येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवृत्त कामगारांनी महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधत त्यांच्या मागण्यांसाठी चक्री उपोषणास सुरुवात केली. बुधवारी (दि. २) दुपारी १२ च्या सुमारास ज्येष्ठ कामगार नेते शिवाजी काळे, हनुमंत वाबळे, तुकाराम शितोळे, युनियनचे अध्यक्ष प्रवीण शितोळे, उपाध्यक्ष केशव दिवेकर आदी पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने कामगार कारखानास्थळावर असलेल्या कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्वर्गीय मधुकाका शितोळे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या उपोषणास सुरुवात करण्यात आली.
शिवाजी काळे, हनुमंत वाबळे, तुकाराम शितोळे, प्रवीण शितोळे यांनी सध्या कारखाना चालवत असलेल्या निराणी ग्रुपच्या व्यवस्थापनाला इशारा दिला.यावेळी काळे म्हणाले, आम्ही इथे बसलेलो आहोत. आमच्यापैकी काही कामगार सध्या सेवेत आहेत. काही दिवसांनी त्यांची ही अवस्था आमच्यासारखीच होईल. सेवेत असणाऱ्या काही बगलबच्च्यांनी आमच्याविषयी व्यवस्थापनाचे कान फुंकण्याचे काम करू नये. वेळ आली तर न्यायालयीन लढा देखील लढू, असे वाबळे म्हणाले. या वेळी मोठ्या संख्येने निवृत्त कामगार उपस्थित होते.