पाटबंधारे विभागाने ऊस बिलातून केली पाणीपट्टीची वसुली, शेतकरी नाराज

कोल्हापूर : चंदगड पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून थेट पाणीपट्टीची रक्कम कपात केली आहे. साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग होण्यापूर्वी पाटबंधारे विभागाने परस्पर पैसे कपात केल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

चंदगड पाटबंधारे विभागाची ही पाणीपट्टी वसुलीची पद्धत चुकीची असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी आहे. चार वर्षांपासून अनेक शेतकऱ्यांना कपात झालेल्या रकमेच्या पावत्याच मिळाल्या नाहीत. ओलम, अथर्व व इकोकेन या साखर कारखान्यांकडे असलेल्या शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून परस्पर रक्कम कपात केली जाते. जमिनीची मोजणी करुन पाणीपट्टी आकारली पाहिजे, पण मोजणीदार कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याचे कारण पुढे करत पाटबंधारे विभाग अंदाजे रक्कम आकारुन पाणीपट्टी वसूल करत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. ऊस बिलातून दरवर्षी पाणीपट्टी कपात करुन घेतली जाते. मात्र कपात केलेल्या रकमेच्या पावत्या शेतकऱ्यांना दिल्या जात नाहीत.

चालू वर्षी ओलम, अथर्व व इको केन या कारखान्याकडून जवळपास ६० लाखांची रक्कम आतापर्यंत कपात झाली आहे. पण अद्याप शेतकऱ्यांना पावत्या दिलेल्या नाहीत. पाणीपट्टीची रक्कम शेतकरी स्वतः भरण्याला तयार आहेत. यासाठी आकारणी योग्य पद्धतीने व्हावी व कपात करून घेतलेल्या रकमेच्या पावत्या तत्काळ शेतकऱ्यांना द्याव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here