मुंबई : महाराष्ट्रात एकनाथ शिंदे सरकारने राज्यात पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात केली आहे. राज्यात पेट्रोल ५ रुपयांनी तर डिझेल ३ रुपयांनी स्वस्त करण्याची घोषणा केली आहे. शिंदे सरकारच्या या घोषणेमुळे सर्वासामांन्य लोकांना दिलासा मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, अधिकाऱ्यांशी चर्चेनंतर पेट्रोल ५ रुपयांनी आणि डिझेल ३ रुपयांनी कमी करण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला आहे. जे शेतकरी नियमित कर्ज परतफेड करीत आहेत, त्यांना प्रोत्साहनपर ५०,००० रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यामध्ये ज्या शेतकऱ्यांना पूर्वी नुकसान भरपाई दिली गेली आहे, त्यांचा समावेश नव्हता. आता अशा शेतकऱ्यांचाही समावेश करण्यात आला आहे.
टीव्ही९हिंदीने दिलेल्या वृत्तानुसार, यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, जे लोक १९७५ च्या आणिबाणीच्या कालखंडात तुरुंगात गेले होते, अशा लोकांनाही निवृत्तीवेतन दिले जाईल. हा निर्णय २०१८ मध्ये घेण्यात आला होता. मात्र, आधीच्या सरकारने निर्णय रद्द केला. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, राज्यात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनलाही मंजुरी दिली आहे. महाराष्ट्रात राजकीय अस्थिरतेनंतर सत्तेवर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पेट्रोल ५ रुपये आणि डिझेल ३ रुपयांनी स्वस्त करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मुंबईत आता पेट्रोल १०६.३५ रुपयांना मिळेल. तर डिझेल ९४.२८ रुपयांना मिळणार आहे.