पाटणा : बिहारमधील साखर कारखान्यांमध्ये महाराष्ट्र मॉडेल लागू केले जाणार आहे. या तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यासाठी बिहारच्या साखर कारखान्यांचे प्रतिनिधी महाराष्ट्रात येणार आहेत. बुधवारी ऊस उद्योग मंत्री प्रमोद कुमार यांच्या अध्यक्षतेखाली विभागाच्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीनंतर मंत्र्यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील साखर कारखान्यांतील अधिकाऱ्यांनी आपल्याकडे वापरल्या जाणाऱ्या तंत्राची सविस्तर माहिती दिली आहे. ते म्हणाले की, ऊसाची लागण, व्यवस्थापन, तोडणी, वाहतूक, बिल पेमेंटबाबत सर्व माहिती मिळाली असून ही प्रक्रिया बिहारमध्येही लागू केली जाणार आहे.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, ऊस उद्योग मंत्र्यांनी सांगितले की, ऊसाच्या कमी खर्चात अधिक बियाणे तयार करण्याच्या तंत्राचा वापर बिहारमधील शेतकरीही करतील. ऊस उत्पादनाच्या प्रगत तंत्राचे प्रशिक्षण शेतकऱ्यांना दिले जाईल. एकडोळा पद्धतीने बियाणे तयार करण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांमध्ये जागृती करत अनुदान उपलब्ध केले जाईल. या पद्धतीने बियाणे तयार करण्यासाठी २२ ऑगस्ट रोजी बेतियामध्ये प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यामध्ये भात बियाणे वापरणाऱ्या शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाईल. ऊस उद्योग मंत्र्यांसोबतच्या बैठकीस उपायुक्त गिरीवर दयाल, संयुक्त संचालक ओंकार नाथ सिंह, जयप्रकाश नारायण सिंह, विभागीय अधिकारी, साखर कारखान्यांचे प्रतिनिधी, महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचे प्रतिनिधी, पदाधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने सहभागी झाले होते.