कूरेभार (सुल्तानपूर): जिल्ह्यात एकमेव असलेल्या किसान सहकारी साखर कारखान्यात रात्री दोन वाजता पॅनचा स्फोट झाला. पॅन फुटल्याने कारखाना बंद पडला आहे. या अपघातात घटनास्थळी असलेले कर्मचारी सुखरूप बचावले. दिवसभर कारखान्याच्या यांत्रिकी विभागाच्या टीमने दुरुस्तीचे प्रयत्न केले. मात्र, सायंकाळपर्यंत गाळप पुन्हा सुरू होऊ शकले नाही.
कारखान्यातील गाळप बंद पडल्याने कडाक्याच्या थंडीत ऊस घेऊन शेतकऱ्यांसमोरील अडचणी वाढल्या आहेत. कारखान्याच्या यार्डमध्ये उसाने भरलेल्या ट्रॅक्टर्सच्या रांगा लागल्या आहेत.
किसान सहकारी साखर कारखान्यातील चार क्रमांकाच्या पॅनचा रात्री दोनच्या सुमारास स्फोट झाला. पॅन फुटल्याने कारखान्यात गोंधळ उडाला.
स्फोटाचा आवाज मोठा झाल्याने कामगारांत घबराट पसरली. घटनास्थळी असलेला पॅनमॅन चंदीप राय आणि अन्य कामगार हे अपघातातून बचावले.
कोणालाही दुखापत न झाल्याने कामगार, व्यवस्थापनाने सुटकेचा श्वास टाकला. कामगारांनी कारखान्याचे सर व्यवस्थापक प्रताप नारायण यांना याची माहिती दिली.
नारायण यांनी घटनास्थळी पाहणी करून यांत्रिकी विभागाला तातडीने दुरुस्तीच्या सूचना केल्या. दिवसभर दुरुस्ती सुरू राहिली. मात्र, त्यात यश आले नाही. त्यामुळे पुन्हा गाळप सुरू होऊ शकले नाही.
गाळप बंद पडल्याने कारखान्याला ऊस घेऊन आलेल्या शेतकऱ्यांसमोरील अडचणी वाढल्या आहेत. कारखान्यासमोर उसाने भरलेल्या ट्रॅक्टर्स आणि ट्रॉल्यांच्या रांगा लागल्या आहेत.
दरम्यान, जुन्या सामुग्रीसह सुरू असलेल्या किसान सहकारी साखर कारखान्याला वारंवार तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. गेल्या गळीत हंगामातही साखर कारखान्यातील पॅनचा स्फोट झाला होता. त्यामुळे दोन दिवस कारखान्यातील गळीत बंद पडले होते.
दरम्यान, यासंदर्भात कारखान्याच्या सर व्यवस्थापक प्रताप नारायण म्हणाले, मंगळवारी रात्री पॅनचा स्फोट झाल्याने गाळप बंद झाले आहे. यांत्रिकी विभागाला दुरुस्तीच्या सूचना दिल्या आहेत. त्वरीत दुरुस्ती करून गाळप पुन्हा सुरू केले जाईल.