यावर्षी देशात मान्सून चांगलाच बरसणार, हवामान विभागाचा अंदाज

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या हवामान विभागाकडून यंदाच्या मान्सूनबाबतचा अंदाज जाहीर झाला आहे. यावर्षीचा पावसाळा नेहमीप्रमाणे सामान्य असेल असे सांगितले जात आहे. हवामान विभागाने शुक्रवारी ही माहिती दिली. दक्षिण-पश्चिम मान्सूनपासून देशात ७५ टक्के पाऊस पडतो. त्याचे प्रमाण यावर्षी नियमित असेल.

पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम. राजीवन यांनी एका ऑनलाइन पत्रकार परिषदेत सांगितले की, यावर्षी दीर्घकाळ पाऊस पडणार आहे. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांसाठी त्यांनी पावसाचे दीर्घकालीन हवामान अंदाज जारी केला आहे. मान्सूनचा कालावधी ९८ टक्क्यांचा असेल. ही नियमित स्थिती आहे. देशासाठी ही सर्वात चांगली बातमी मानली जात आहे. त्यामुळे शेती उत्पादनांसाठी शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे.

चांगल्या पावसाचे स्कायमेटचेही संकेत
अलिकडेच हवामान अंदाज व्यक्त करणारी कंपनी स्कायमेटने आगामी मान्सून बाबत आपला अहवाल प्रसिद्ध केला आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, यंदा चांगला पाऊस होणार आहे. देशाच्या ७५ टक्के भागात जून ते सप्टेंबर या कालावधीत चांगला पाऊस पडण्याची शक्यता स्कायमेटने व्यक्त केली आहे.

स्कायमेटच्या अनुमानानुसार, जून ते सप्टेंबरदरम्यान सक्रिय राहणारा मान्सूनच्या कालावधीत यंदा एकूण १०३ टक्के पाऊस पडेल. उत्तर क्षेत्रातील मैदानी भाग आणि पूर्वोत्तर भारतातील काही भागात पूर्ण हंगामात कमी पावसाची शक्यता आहे. तर कर्नाटकचा आतील भाग, गुजरात आणि महाराष्ट्राच्या काही भागात कमी पावसाचा अंदाज आहे. दुसरीकडे पूर्वेकडील राज्यांपैकी बंगाल, ओडिसा, छत्तीसगढ, झारखंड, बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेशात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here