अहिल्यानगर : महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत येणाऱ्या पाडेगाव केंद्राला कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील यांनी भेट दिली. भविष्यातील बदलत्या हवामानात भारतीय ऊस शेतीतील आव्हाने पेलण्यासाठी केंद्राने मूलभूत संशोधन करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. केंद्रातील शास्त्रज्ञ व कर्मचाऱ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. पाडेगाव येथील मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राने बेणे विक्रीतून सर्वांत जास्त महसूल मिळवून दिला आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले. केंद्राचे ऊस विशेषज्ञ डॉ. राजेंद्र भिलारे व पुणे कृषी महाविद्यालयातील मृदा शास्त्रज्ञ डॉ. धर्मेंद्र कुमार फाळके उपस्थित होते.
डॉ. पी.जी. पाटील म्हणाले की, पाडेगाव संशोधन केंद्राने उसावरील चाबूक काणी रोगासाठी प्रतिकारक्षम स्त्रोत म्हणून २०१६ मध्ये कोएम ७६०१, एमएस ७६०४ या दोन आणि २०२३ मध्ये कोएम ११०८६ व कोएम १३०८२ अशा चार जनन द्रव्यांची संरक्षण विभागात नोंदणी केली. डॉ. सूरज नलावडे, डॉ. कैलास भोईटे, डॉ. कैलास काळे, प्रा. शालिग्राम गांगुर्डे, डॉ. सुरेश उबाळे, डॉ. दत्तात्रय थोरवे, डॉ. किरणकुमार ओंबासे व डॉ. माधवी शेळके आदी उपस्थित होते. डॉ. दत्तात्रय थोरवे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. सुरेश उबाळे यांनी आभार मानले.