बिद्री, कोल्हापूर : दि. ९आधुनिक तंत्रज्ञानातून शेती करण्यासाठी माती परीक्षण काळाची गरज असून बिद्री साखर कारखान्याने याची दखल घेत कारखाना कार्यस्थळावर डॉ. व्ही. टी. पाटील माती परीक्षण प्रयोगशाळा सुरु केले आहे. शेतीमध्ये होणारे बदल लक्षात घेवून शेतकऱ्यांना गरजेचे असलेली हि प्रयोगशाळा निश्चितच उपयुक्त ठरेल असे प्रतिपादन बिद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार के. पी. पाटील यांनी केले.
बिद्री ता. कागल येथील श्री. दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या वतिने उभारण्यात आलेल्या माती परीक्षण प्रयोगशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी अध्यक्ष पाटील यांच्या हस्ते फित कापून प्रयोगशाळेचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी अध्यक्ष पाटील म्हणाले, साखर कारखानदारीत ऊसाचे उत्पादन वाढणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी कारखान्यामार्फत विविध उपक्रम राबविले जात आहेत. कारखाना कार्यक्षेत्रातील सुमारे ८० शेतकऱ्यांना वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले असून ७० शेतकऱ्यांच्या प्लाँटमधून अध्ययावत तंत्रज्ञानातून ऊसाचे पीक घेतले आहे. ऊसवाढीच्या मार्गदर्शनासाठी कृषीतज्ञ डॉ. संजीव माने यांचे सातत्याने प्रत्यक्ष प्लाँटवर मार्गदर्शन घेतले जात आहे. त्यामुळे या उपक्रमांचा लाभ शेतकऱ्यांना होणार आहे.
ते म्हणाले, कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी मातीचे परीक्षण केले नसल्याने खताची निश्चित मात्रा दिली जात नाही. पर्यायाने ऊसपिकाला त्याचा तोटा सहन करावा लागतो. कारखान्याने याची दखल घेवून स्वतःची अध्ययावत माती परीक्षण प्रयोगशाळा सुरु केली आहे. यामुळे मातीचे परीक्षण होऊन पिकाला आवश्यक बाबी देणे शक्य होणार आहे. कारखान्यासह सहवीज प्रकल्पाचे विस्तारीकरण तसेच डिस्टिलरी प्रकल्पाची उभारणी भविष्यात वरदान ठरणार आहेत. त्याच पध्दतीने शेतकऱ्यांच्या हितासाठी मातीपरीक्षण प्रयोगशाळेबरोबरच अन्य सेवा-सुविधा पुरविण्यासाठी संचालक मंडळ कार्यरत राहिल.
यावेळी संचालक श्रीपती पाटील, धनाजीराव देसाई, राजेंद्र पाटील, प्रविण भोसले, उमेश भोईटे, अशोक कांबळे, व्यवस्थापकीय संचालक आर. डी. देसाई, कार्यकारी संचालक के. एस. चौगले यांच्यासह खातेप्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.