सांगली : राज्य सरकारने ऊस तोडणी कामगारांकडून होणारी फसवणूक टाळण्यासाठी नवीन कायदा करण्यासाठी पावले उचलली आहेत. नवीन कायद्यामुळे तोडणी कामगारांकडून होणारी लूट थांबणार आहे. स्वाभिमानी वाहतूक संघटनेतर्फे यासाठी मोठा लढा दिला होता, अशी माहिती स्वाभिमानी ऊस तोडणी वाहतूक संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष संदीप राजोबा यांनी दिली. स्वाभिमानी ऊस तोडणी वाहतूक संघटनेच्या रेट्यामुळे जवळपास एक हजार ५०० गुन्हे नोंद झाले आहेत. तसेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये २२ कोटी व सांगली जिल्ह्यामध्ये १४ कोटी रुपये ऊस वाहतूकदारांचे वसूल झाले आहेत असे ते म्हणाले.
संदीप राजोबा यांनी सांगितले की, आम्ही ११ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून तोडणी मजुरांकडून होणाऱ्या फसवणुकीबद्दलच्या कायद्यामध्ये बदल करावा, ५० टक्के रक्कम भरल्याशिवाय जामीन देऊ नये अशी मागणी केली होती. मुख्यमंत्री फडणवीस यांनी ऊस तोडणी कामगारांकडून होणाऱ्या फसवणुकीबाबत नवीन कायदा करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार नवीन कायदा अधिवेशनात मंजूर झाला आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आलेला आहे. यासाठी स्वाभिमानी ऊस तोडणी वाहतूक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी व भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार यांनी सहकार्य केले आहे.