पानीपत : हरियाणातील पानीपत जिल्ह्यात नव्या साखर कारखान्याच्या स्थापनेमुळे शेतकरी आणि युवकांना मोठा फायदा होणार आहे. येथे साखर कारखाना सुरू व्हावा यासाठी शेतकऱ्यांनी अनेकवेळा आंदोलन केली आहेत. सरकारकडून मुदतीत कारखान्याची उभारणी व्हावी यासाठी शेतकऱ्यांनी पाठपुरावा केला. आता त्यांचे स्वप्न साकार होताना दिसून आले आहे. एक मे रोजी या कारखान्याचे उद्धाटन मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या हस्ते होणार आहे.
याबाबत झी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पानीपत डाहर शुगर मिलचे उद्घाटन होईल. पानीपतच्या या नव्या कारखान्याचे कार्यकारी संचालक नवदीप सिंह यांनी सांगितले की, एक मे रोजी सायंकाळी पाच वाजता नव्या कारखान्याचे उद्घाटन होईल. यावेळी सहकार मंत्री बनवारीलाल, खासदार संजय भाटीया, आमदार महिपाल ढांडा, प्रमोद वीज आदी उपस्थित राहतील. नवदीप यांनी सांगितले की, नव्या साखर कारखान्याच्या चाचणीदरम्यान, १५ लाख ऊसाचे गाळप हंगामात करता येईल याची तपासणी झाली आहे. दररोज ५० हजार क्विंटल उसाचे गाळप करता येणार आहे. खासदा संजय भाटीया यांनी या कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा विकास होईल असे सांगितले. याचे लोकार्पण मुख्यमंत्री करणार असल्याचे ते म्हणाले.