पुणे : थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी साखर कारखान्याच्या जमिनीची विक्री करून भागभांडवल उभे करणे, एवढा एकच पर्याय आहे. इतर सर्व पर्याय संपलेले आहेत, असे यशवंत सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सुभाष जगताप यांनी सांगितले. केंद्र व राज्य पातळीवर कारखाना कर्जासाठी पात्र ठरत नाही. एकूण सर्व पर्याय संपल्याने कारखान्याच्या ९९.२७ एकर जमिनीची विक्री करून कारखाना सुरू करण्यास प्राधान्य दिले आहे. कारखान्याच्या २२३ एकर जमीन जप्तीचे आदेश बँकांना प्राप्त झाले आहेत.
या परिस्थितीत संचालक मंडळाने राज्य शासनाच्या माध्यमातून बँकांशी चर्चा करून एकरकमी कर्जफेडीचा प्रस्ताव दिला आहे. कर्जफेडीसाठी बँकांची परवानगी घेऊन ही जमीन विक्री प्रक्रिया राबविण्याची तयारी संचालक मंडळाने करून या संस्थेला बुडत्यापासून वाचविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही जगताप यांनी सांगितले. अध्यक्ष जगताप म्हणाले, कारखाना सुरू करण्यासाठी शासनामार्फत कारखान्याला मदत होत आहे. राज्य सहकारी बँक ५७.१७ कोटी, बँक ऑफ बडोदा कुंजीरवाडी शाखा ४१.०१ कोटी, स्टेट बँक ऑफ इंडिया उरुळी कांचन २७.०९ कोटी, बँक ऑफ इंडिया थेऊर २२.६७ कोटी, तसेच पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक २८ लाख रुपये असे एकूण १४८.२२ कोटी इतकी देणी आहेत. मात्र, कारखान्याने वरिष्ठ नेतेमंडळीच्या सहकार्यातून ३६ कोटी ५३ लाख इतक्या किमतीत सर्व बँकांची ओटीएसमधून परतफेड करणार असल्याचे निश्चित केले आहे. त्यानंतर कर्जफेडीसाठी जमीन विक्री बाजार समितीला करण्याचा पर्याय सभासदांपुढे ठेवणार आहे.