नवी दिल्ली : सध्या भारत भलेही इराणकडून कच्च्या तेलाची खरेदी करीत नसला तरी, ताज्या हवाई हल्ल्यांनंतर दोन्ही देशांतील तणाव पाहता कच्चे तेल आणखी भडकण्याची शक्यता नाकारता येत नाही. कच्चे तेल महागल्यास भारतीय अर्थव्यवस्थेला ते परवडणारे नाही. या शिवाय इराण आणि भारत यांच्यातील व्यापारावरही वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे.
इराणने बुधवारी अमेरिकी सैन्याच्या इराकमधील तळांवर दोन डझनांहून अधिक क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाण्याची शक्यता आहे. दोन्ही देशांतील तणाव वाढल्याने बुधवारी दुपारी ब्रेंट कच्च्या तेलात ४.७२ टक्क्यांची वाढ होऊन ते प्रति बॅरल ७१.७५ डॉलरच्या उच्चांकी पातळीवर गेले. त्यानंतर कच्चे तेल ०.५५ टक्क्यांच्या तेजीसह ६८.८९ डॉलरवर आले होते.
एका अहवालानुसार, आर्थिक वर्ष २०१९मध्ये भारतातून इराणमध्ये होणाऱ्या निर्यातीत १८ टक्क्यांची वाढ झाली आहे. या शिवाय इराणमधून होणाऱ्या आयातीतही २० टक्क्यांची वाढ झाली आहे. भाजीपाला, साखर, मिठाई, चॉकलेट आणि पशूखाद्याची निर्यात वाढली आहे. आर्थिक वर्ष २०१८ मध्ये इराणला झालेल्या निर्यातीत सात टक्क्यांपेक्षा अधिक वाढ नोंदविण्यात आली आहे. इराण आणि अमेरिका यांच्यात युद्धजन्य स्थिती निर्माण झाल्याचा मोठा फटका भारताला बसण्याची शक्यता आहे.
इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावाचा परिणाम म्हणून शेअर बाजारातही मोठी घसरण पहायला मिळण्याची शक्यता आहे. इराणचे वरिष्ठ सैन्य कमांडर अमेरिकी ड्रोन हल्ल्यात मारले गेल्याचे वृत्त थडकताच सेन्सेक्स ९०० अंकांनी कोसळला होता. इराणने बुधवारी अमेरिकेच्या तळांवर केलेल्या हल्ल्यांनंतर ‘सेन्सेक्स’ मध्ये दुपारपर्यंत जवळपास १६१ अंकांची घसरण झाल्याचे दिसून आले होते. एकंदरीतच अमेरिका आणि इराण यांच्यात सध्या सुरू असलेल्या तणावाचा फटका २०२५ पर्यंत देशाची अर्थव्यवस्था पाच लाख कोटी डॉलरपर्यंत पोहोचचविण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नांना बसण्याची शक्यता आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.