पुणे : सोमेश्वर तसेच भीमाशंकर कारखान्याने २८०० रुपयांचा पहिला हप्ता जाहीर केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ऊसदराची कोंडी सुटण्याची चिन्हे दिसू लागली असून, अंतिम साखर उताऱ्यानुसार सरासरी भाव ३१०० ते ३१५० रुपयांपर्यंत राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पहिला हप्ता आता दिल्यानंतर गाळप हंगाम संपताच ‘एफआरपी’ची उर्वरित रक्कम शेतकऱ्यांना द्यावी लागणार आहे. भीमाशंकर सहकारी साखर कारखाना चालु हंगामात गाळप केलेल्या उसाला एफआरपीनुसार प्रती टन ३१०० रुपये दर देणार आहे. त्यापैकी २८०० रुपये आता देणार असून, उर्वरित ३०० रुपये गाळप हंगाम संपल्यानंतर एक महिन्याच्या आता ऊस उत्पादकांच्या खात्यावर जमा करणार असल्याची माहिती भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेव बेडे यांनी दिली.
बेडे म्हणाले, आत्तापर्यंत गाळप केलेल्या उसाला पहिली उचल प्रतिटन २६३० रुपये दिले आहे, परंतु संचालक मंडळ तसेच ऊस उत्पादकांचा आग्रह होता की, पहिली उचल इतर कारखान्याप्रमाणे वाढवून २८०० रुपये द्यावी, त्यानुसार सोमवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला की, चालु गाळप हंगामात गाळप केलेल्या उसाला प्रतिटन एफआरपी दर ३१०० रुपये देणार असून, त्यापैकी २८०० रुपये लगेच देणार असून, उर्वरित ३०० रुपये गाळप हंगाम संपल्यानंतर एक महिन्याच्या आत शेतकऱ्यांना देणार आहोत. ते म्हणाले, भीमाशंकर साखर कारखान्याचा ३१०० रुपये एफआरपी दर आहे. हा अंतिम दर नसून, कारखान्याचे संस्थापक आमदार दिलीप वळसे पाटील हे अंतिम दर कारखान्याच्या वार्षिक सभेत जाहीर करत असतात. त्यामुळे त्यामध्ये थोडीफार वाढ होऊ शकते. कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे-पाटील म्हणाले कि, भीमाशंकर कारखान्याने आतापर्यंत पाच लाख टन उसाचे गाळप केले असून, एकूण पाच लाख १४ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. अजून साडेपाच ते सहा लाख टन ऊस गाळप होणे बाकी आहे. नोंदी केलेल्या सर्व उसाचे गाळप केले जाईल.
सोमेश्वर कारखान्याने एफआरपीचा पहिला हप्ता प्रतिटन २८०० दिला आहे. मात्र, सोमेश्वर कारखान्याचा साखर उतारा ११.२४ टक्के इतका जिल्ह्यात सर्वाधिक आहे. अन्य कारखान्यांच्या तुलनेत तो अर्ध्या टक्क्यपिक्षा जास्त आहे. तसेच, हंगामाअखेर एकूण उतारा बारा टक्क्यांच्या पुढे जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. उतारा अंतिम होताच एकूण एफआरपी ३१५० रूपयांवर पोचणार आहे. हंगाम संपताच एफआरपीची उर्वरित रक्कम प्रतिटन ३५० स्पर्याप्रमाणे शेतकऱ्यांना द्यावी लागणार आहे. सोमेश्वर कारखान्याचा निम्मा गाळप हंगाम उरकला असून, ६६ दिवसांत ९२०० टन प्रतिदिन क्षमतेने ६ लाख ४ हजार टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे. अजूनही सुमारे ६ लाख टन ऊस उपलब्ध असून, मार्चअखेरच कारखाना बंद होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, जिल्ह्यात सलग सातव्या वर्षी सोमेश्वरचाच उतारा सर्वाधिक ठरला आहे.
साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.