जी 20 विकास मंत्र्यांच्या बैठकीला पंतप्रधानांनी केले संबोधित

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज G20 विकास मंत्र्यांच्या बैठकीला व्हिडिओ संदेशाद्वारे संबोधित केले.

मेळाव्याला संबोधित करताना पंतप्रधानांनी लोकशाहीच्या जननी असलेले सर्वात प्राचीन जिवंत शहर वाराणसी येथे सर्वांचे स्वागत केले. आपल्या भाषणात पंतप्रधानांनी काशीचे महत्त्व अधोरेखित केले. काशी हे शतकानुशतके ज्ञान, चर्चा, परिसंवाद, संस्कृती आणि आध्यात्मिकतेचे केंद्र राहिले आहे, तसेच देशातील सर्व भागातल्या लोकांसाठी अभिसरण केंद्र ठरताना भारताच्या वैविध्यपूर्ण वारशाचे सारही इथे अनुभवायला मिळते, असे ते म्हणाले. जी 20 विकास कार्यक्रम काशीपर्यंत पोहोचल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला.

“विकास हा दक्षिणेकडील देशांसाठी (ग्लोबल साऊथ ) मुख्य मुद्दा आहे”, असे पंतप्रधानांनी नमूद केले. जागतिक कोविड महामारीमुळे आलेले अडथळे तसेच भू-राजकीय तणावामुळे अन्न, इंधन आणि खतांबाबत निर्माण झालेले संकट याचा दक्षिणेकडील देशांवर गंभीर परिणाम झाल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. अशा परिस्थितीत तुमच्याकडून घेतले जाणारे निर्णय संपूर्ण मानवजातीसाठी महत्त्वाचे आहेत, असे पंतप्रधानांनी सांगितले.शाश्वत विकासाची उद्दिष्टे मागे पडू न देणे ही लोकांची सामूहिक जबाबदारी आहे, यावर पंतप्रधान मोदी यांनी भर दिला. हे साध्य करण्यासाठी आवश्यक असलेल्या कृती आराखड्याबाबत दक्षिणेकडील देशांनी जगाला ठोस संदेश द्यायला हवा, असे पंतप्रधानांनी सांगितले.

आपले प्रयत्न व्यापक, सर्वसमावेशक, न्याय्य आणि शाश्वत असावेत, तसेच शाश्वत विकास उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी गुंतवणूक वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि अनेक देशांना भेडसावणाऱ्या कर्जाच्या जोखमींवर मार्ग काढण्यासाठी उपाय शोधायला हवेत, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. गरजूंना वित्तपुरवठा सुनिश्चित व्हावा यासाठी पात्रता निकष विस्तारण्याकरिता बहुपक्षीय वित्तीय संस्थांमध्ये सुधारणा आवश्यक असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. भारतात, अविकसित क्षेत्र म्हणून ओळखले गेलेल्या शंभरहून अधिक आकांक्षीत जिल्ह्यांमध्येलोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी आम्ही प्रयत्न केले आहेत,असे त्यांनी सांगितले. हे आकांक्षीत जिल्हे आता देशात विकासाचे उत्प्रेरक म्हणून उदयास आले आहेत ,असे अधोरेखित करून पंतप्रधानांनी जी 20 विकास मंत्र्यांना विकासाच्या या प्रारूपाचा अभ्यास करण्याचे आवाहन केले. “ अजेंडा 2030 ला गती देण्यासाठी तुम्ही कार्य करत असताना हे उपयुक्त ठरू शकते”, असे पंतप्रधानांनी सांगितले.

वाढत्या डेटा विभागणीच्या मुद्द्यावर प्रकाश टाकताना पंतप्रधान म्हणाले की अर्थपूर्ण धोरण तयार करणे, संसाधनांचे कार्यक्षम वाटप आणि प्रभावी सार्वजनिक सेवा वितरण यासाठी उच्च दर्जाचा डेटा महत्त्वाचा आहे. ते म्हणाले की तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण होणे हे डेटाचे विभाजन कमी करण्यात मदत करणारे एक महत्त्वाचे साधन ठरू शकते. पंतप्रधानांनी स्पष्ट केले की, भारतात,डिजिटलायझेशनने एक क्रांतिकारी बदल घडवून आणला आहे जिथे तंत्रज्ञानाचा वापर लोकांना सक्षम करण्यासाठी, डेटा सुलभ करण्यासाठी आणि सर्वसमावेशकता सुनिश्चित करण्यासाठी एक साधन म्हणून केला जात आहे. भारत आपला अनुभव भागीदार देशांसोबत सामायिक करण्यास इच्छुक असल्याचेही पंतप्रधानांनी अधोरेखित केले त्याचबरोबर विकसनशील देशांमध्ये परस्पर चर्चा, विकास आणि वितरणासाठी डेटाला प्रोत्साहन देण्यासाठी या चर्चेचा उपयोग होईल अशी अपेक्षा व्यक्त केली.

“भारतात आम्ही नद्या, झाडे, पर्वत आणि निसर्गातील सर्व घटकांचा खूप आदर करतो”, असे सांगत पंतप्रधानांनी ग्रहानुरूप जीवनशैलीला प्रोत्साहन देणार्‍या आपल्या पारंपरिक भारतीय विचारांवर प्रकाश टाकला. गेल्या वर्षी, संयुक्त राष्ट्रांच्या (UN) महासचिवांसह, पंतप्रधानांनी मिशन लाईफ (LiFE) हे अभियान सुरू केल्याचा पुनरुच्चार केला आणि हा गट उच्च-स्तरीय तत्वे विकसित करण्यासाठी काम करत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. “हवामान बदलावर हे महत्त्वपूर्ण योगदान ठरू शकेल”, असंही ते पुढे म्हणाले.

शाश्वत विकास ध्येय (SDGs) साध्य करण्यासाठी स्त्री-पुरुष समानता आणि महिला सक्षमीकरणाचे महत्त्व अधोरेखित करताना, पंतप्रधानांनी नमूद केले की भारत केवळ महिला सक्षमीकरणापुरता मर्यादित राहिलेला नाही तर महिलांच्या नेतृत्वाखालील विकासासाठी कटीबद्ध आहे. महिला आता विकासाचा जाहीरनामा ठरवत आहेत आणि विकास आणि बदलाच्या माध्यम देखील ठरत आहेत, असे पंतप्रधान मोदी यांनी अधोरेखित केले. महिलांच्या नेतृत्वाखालील विकासासाठी बदल घडवणारी प्रभावी कृती योजना आखावी असे आवाहन त्यांनी सर्वांना केले.

भाषणाचा समारोप करताना पंतप्रधान म्हणाले की, भारतातल्या कालातीत परंपरांमुळे काशीची वेगळी अशी ओळख आहे. पंतप्रधान मोदींनी मान्यवरांना आपला सगळा वेळ बैठकीच्या खोलीत न घालवण्याचे आवाहन केले आणि त्यांना काशीचे चैतन्य शोधण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी प्रोत्साहित केले. ते म्हणाले की,“मला विश्वास आहे की गंगा आरतीचा अनुभव घेतल्याने आणि सारनाथला भेट दिल्याने तुम्हाला अपेक्षित परिणाम साध्य करण्यासाठी प्रेरणा मिळेल” अजेंडा 2030 च्या प्रचारासाठी आणि जगाच्या दक्षिणेकडील भागाच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी होत असलेल्या चर्चेच्या यशासाठी पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या.

(Source: PIB)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here