पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली चालू हंगामातील उष्णतेच्या लाटेच्या सज्जतेचा आढावा घेण्यासाठी बैठक पार पडली.
पंतप्रधानांना एप्रिल ते जून, 2024 या कालावधीतील तापमानाच्या अंदाजाबाबत माहिती देण्यात आली, ज्यात चालू हंगामातील उष्णतेचा अंदाज (एप्रिल ते जून) देण्यात आला तसेच देशातील बहुतांश भागांमध्ये सामान्य कमाल तापमानापेक्षा जास्त राहण्याची शक्यता, विशेषत: मध्य भारत आणि पश्चिम द्वीपकल्पीय भारतात तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची सर्वाधिक शक्यता वर्तवण्यात आली आहे.
अत्यावश्यक औषधे, सलाईन, आइस पॅक, ओआरएस आणि पेयजल या संदर्भात आरोग्य क्षेत्रातील तयारीचा आढावा घेण्यात आला.
दूरचित्रवाणी, रेडिओ आणि सोशल मीडिया यांसारख्या माध्यमांद्वारे विशेषतः प्रादेशिक भाषांमध्ये आवश्यक आयइसी / जागरूकता सामग्रीचा वेळेवर प्रसार करण्यावर भर देण्यात आला. यंदाचा 2024 मधील उन्हाळा सामान्यपेक्षा अधिक कडक असण्याची शक्यता असल्याने तसेच याच काळात सार्वत्रिक निवडणुका असल्याने आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण एनडीएमए द्वारे जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे प्रादेशिक भाषांमध्ये भाषांतर करून त्याचा व्यापक प्रसार करण्याचे आवाहन करण्यात आले.
संपूर्ण सरकारी दृष्टिकोनावर पंतप्रधानांनी भर दिला. ते म्हणाले की, केंद्र, राज्य आणि जिल्हा स्तरावरील सरकारच्या सर्व विभागांनी आणि विविध मंत्रालयांनी एकत्रितपणे यावर काम करणे आवश्यक आहे. रुग्णालयांमध्ये पुरेशी तयारी करण्यासोबतच जनजागृतीवरही पंतप्रधानांनी भर दिला. जंगलातील वणव्यांबाबत त्वरित माहिती घेऊन ते शमवण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.
पंतप्रधानांचे प्रधान सचिव, गृह सचिव, भारतीय हवामान विभाग (आयएमडी) आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अधिकारी या बैठकीत सहभागी झाले होते.