जालना : जिल्ह्यातील मार्च महिना उजाडला तरी अनेकांच्या शेतात अजूनही ऊस उभा आहे. ऊसतोड कामगार मिळत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. साखर कारखान्यांचा हंगाम अंतिम टप्प्यात पोहचला आहे. साखर कारखान्यांची ऊस तोडणी यंत्रणा कोलमडल्याने अंबड व घनसावंगी तालुक्यात अनेक शेतकऱ्यांच्या शेतात ऊस उभा आहे. शेतकरी ऊसतोडीसाठी कारखान्यांकडे हेलपाटे मारताना दिसत आहेत.
मराठवाड्यातील इतर कारखाने मार्च अखेर बंद होण्याची शक्यता आहे तर जालना आणि बीड जिल्ह्यांतील काही कारखाने एप्रिल महिन्यातही सुरू असतील, असे सूत्रांनी सांगितले. घनसावंगी, अंबड तालुक्यात कारखान्यांकडे क्षमतेपेक्षा अधिक नोंद आहे. उपलब्ध उसासाठी कारखाने सुरू ठेवण्यात येतीलही; मात्र मजूर आणायचे कोठून, हा प्रश्न आहे. दुष्काळी परिस्थितीही शेतकऱ्यांना ऊस तोडी वेळेत मिळत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. दरम्यान, उसाचे क्षेत्र संपल्याशिवाय कारखाने बंद करू नयेत, अशी मागणी रामप्रसाद खरात यांनी साखर आयुक्तांकडे केली होती. त्याची दखल घेऊन अतिरिक्त ३ लाख टन उसाचे नियोजन करण्यात आले आहेत.