पुणे : गेल्या ९० दिवसांपासून सुरू असलेल्या रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्यातील कामगारांच्या आंदोलनावर अखेर तोडगा निघाला. पन्नास टक्के पगारासाठी ठाम असलेल्या कामगारांनी तीन पगार आणि इतर मागण्या मान्य झाल्याने संप मागे घेतला आहे. कामगारांना ७ ऑक्टोबर रोजी दोन पगार देण्यात येणार आहेत. त्यानंतर आठवडाभरात आणखी एक पगार दिला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
कारखान्याने कामगारांना दहा महिने पगार दिलेला नाही. त्यामुळे कामगारांनी आंदोलन सुरू केले. तीन महिन्यांच्या आंदोलनातून तोडगा निघत नव्हता. दरम्यान, डिसेंबर २०२३ पर्यंत कामगारांची थकीत देणी देणार असल्याचे आश्वासन कारखाना प्रशासनाने दिले आहे. पहिल्या टप्प्यात पगारवाढीचा एक हफ्ता मिळेल. हंगामी कामगारांना रिटेंशन अलाउंन्सचा एक हफ्ताही दिला जाणार आहे.
दरम्यान, कारखाना आणि सभासदांच हीत लक्षात ठेवून आंदोलन मागे घेतल्याचे कामगार नेते महादेव मचाले, पतसंस्थेचे संचालक तात्यासाहेब शेलार, मार्गदर्शक नानासाहेब मासाळ यांनी सांगितले. कामगार उद्यापासून काम सुरू करतील असे सांगण्यात आले. मासाळ म्हणाले की, रखडलेल्या पगारातील ५० टक्के रक्कम मिळाल्यास दिलासा मिळणार आहे. कामगारांनी मध्यम मार्ग काढून शेतकरी, सभासदांचे हित जोपासत संप मागे घेतला आहे.