कोल्हापूर : विरोधक आणि सत्तारुढ गटांने घातलेल्या गोंधळामुळे कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सभा पाचच मिनिटात आटोपती घेतली. पहिल्या पाचच मिनिटात सभेचे सर्व विषय मंजूर करण्यात आले. कारखाना बचाव कृती समितीने यापूर्वी कारखाना प्रशासनाला १६ लेखी प्रश्न विचारले होते. यावर घेतल्या जाणाऱ्या प्रशासनाच्या भूमिकेकडे सभासदांचे लक्ष लागून होते. पण सभा गुंडाळल्यामुळे सभासदांची निराशा झाली. सभेच्या दरम्यान, विरोधकांनी सभेत गोधळ केला, असा सत्तारुढ गटाने आरोप केला तर आंम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देता येत नसल्याने सत्तारूढ गटाने सभा गुंडाळली असा आरोप विरोधी गटाने केला.
सभेच्या सुरुवातीला स्वागत कार्यकारी संचालक निकम यांनी केले, तर प्रास्ताविक हरीश चौगुले यांनी केले. यानंतर माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे भाषण सुरु झाले, तोच सभासदांच्यामधून लेखी प्रश्नांची उत्तरे प्रथम द्या अशी मागणी करण्यात आली. या प्रश्नांची उत्तरे ही पोस्टाने प्रत्येकाच्या घरी पाठवली आहेत, असे सांगण्यात आले. यावर विरोधकांचे समाधान झाले नाही. यावेळी नितीन पारखे यांनी मेगा फोन घेऊन बोलण्यास सुरुवात केली. यावर महाडीक यांनी तुला माईक कोणी दिला असा प्रश्न विचारल्यानंतर गोंधळाला सुरुवात झाली. स्टेज समोर बसलेले सत्तारूढ गटाचे कार्यकर्ते सर्व विषय मंजूर मंजूर अशा घोषणा देण्यात येऊ लागल्या. अखेर सभा संपली असे सांगण्यात आले.
यावेळी आंम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे द्यायची होती, पण विरोधकांना सभेत गोंधळच करायचा होता म्हणून त्यांनी सभा उधळून लावली, असे महादेवराव महाडीक यांनी सांगितले. या सभेनंतर विरोधकांनी समांतर सभा घेतली. यावेळी कारखान्याच्या सुरक्षा रक्षकांकडून याला मज्जाव करण्यात आला. यावर काही तरुणांची त्यांच्याशी बाचाबाची झाली. सभा घेण्याचा अधिकार आंम्हाला आहे, तुम्ही कोण अडवणार अशी विचारणा त्यांना या वेळी करण्यात आली.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.