नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी सकाळी गेल्या २४ तासांतील नव्या कोरोना संक्रमितांची आकडेवारी जारी केली आहे. त्यानुसार देशभरात नवे ३,२९,९४२ कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर ३८७६ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. मंत्रालयाने सांगितले की, याच कालावधीत ३,५६,०८२ जण पूर्णपणे बरे होऊन रुग्णालयातून घरी गेले आहेत. तर २५,०३,७५६ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. त्यानंतर देशात आता एकूण संक्रमितांची संख्या २ कोटी २९ लाख ९२ हजार ५१७ झाला असून एकूण मृतांची संख्या २ लाख २९ हजार ९९२ झाली आहे.
देशभरात १६ जानेवारी रोजी सुरू झालेल्या लसीकरण मोहिमेत आतापर्यंत १७,२७,१०,०६६ जणांना लस देण्यात आली आहे. तर आतापर्यंत कोरोनातून पूर्णपणे बरे झालेल्यांची संख्या १,९०,२७,३०४ झाली आहे. देशात सध्या ३७,१५,२२१ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारअखेर देशात ३०,५६,००,१८७ चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी १८,५०,११० चाचण्या काल करण्यात आल्या.
या महिन्यात आतापर्यंत चार दिवस दररोज ४ लाखांहून अधिक संक्रमित रुग्णांची संख्या वाढल्यानंतर आता गेल्या काही दिवसांत कोरोना प्रसार मंदावल्याचे सकारात्मक चित्र आहे. १ मे रोजी पहिल्यांदा ४ लाख रुग्ण आढळले होते. त्यापूर्वी २१ एप्रिल रोजी कोरोना रुग्णांची दैनंदिन संख्या ३ लाखांवर गेली होती. मात्र दहा दिवसांत, एक मे रोजी ही रुग्णसंख्या एक लाखाने वाढली होती.
२०१९च्या अखेरीस चीनमधील वुहान शहरातून सुरू झालेल्या कोरोना प्रसाराने गेल्या वर्षी सात ऑगस्ट रोजी २० लाखांचा आकडा पार केला. त्यानंतर २३ ऑगस्ट रोजी ३० लाक, पाच सप्टेंबर रोजी ४० लाख, सोळा सप्टेंबर रोजी ५० लाख रुग्मसंख्या झाली. गेल्यावर्षीच २८ सप्टेंबर रोजी ६० लाख, ११ ऑक्टोबर रोजी ७० लाख, २९ ऑक्टोबर रोजी ८० लाख, २० नोव्हेंबर रोजी ९० लाख तर १९ डिसेंबरला रुग्णसंख्या एक कोटीवर गेली. १९ एप्रिल रोजी रुग्णसंख्येने १.५ कोटींचा तर ४ मे रोजी २ कोटींचा आकडा पार केला आहे.