गेल्या वर्षीच्या तुलनेत 200 ते 300 रुपयांची तफावत
कोल्हापूर, दि. 31 ऑगस्ट 2018 : यावर्षीचा साखर हंगाम दोन महिन्यावर येऊन ठेपला आहे. साखर हंगाम सुरू होण्यापूर्वी गेल्या वर्षीच्या साखरेला चांगला दर मिळतो असा आतापर्यंतचा इतिहास आहे, यावर्षी मात्र याला अपवाद निर्माण झाला आहे. कारण गेल्या वर्षीच्या शिल्लक साखरेमुळे हे दर कमी झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी प्रति क्विंटल साखरे मागे 200 ते 300 रुपयांची कपात झाली आहे. हे दर आणखी कमी होणार असे संकेत दिले जात आहेत.
या वर्षी साखरेचे उत्पादन वाढले आहे याचा फटका येणाऱ्या म्हणजेच 2018 19 या गळीत हंगामात ही बसणार आहे दरम्यान गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी गेल्यावर्षी प्रति क्विंटल साखरेचे दर 3400 ते 3500 पर्यंत होते. यावर्षी मात्र सरासरी 3100 ते 3200 पर्यंत दर मिळत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत क्विंटल साखरेचे दर 200 ते 300 रुपयांची घट दिसून येत आहे. याचा कारखानदारांसह शेतकऱ्यांनाही फटका बसणार आहे.
प्रत्येक वर्षी नवीन हंगाम सुरू होण्यापूर्वी प्रतिक्विंटल साखरेला चांगला दर मिळत असतो. या दरावरच उसाची एफआरपी निश्चित केली जाते. आता मात्र ती परिस्थिती राहिली नाही. यावर्षी दर वाढण्याची प्रतिक्विंटल 20 ते 50 रुपयांपर्यंत दर कमी कमी होत चालला आहे. त्यामुळे कारखानदारांसह शेतकऱ्यांमध्येही चिंता व्यक्त केली जात आहे.