सांगली : राज्यातील साखर कामगारांच्या नव्या पगारवाढीचा मसुदा तयार करून तो राज्य सरकार आणि राज्य साखर संघाकडे सादर करणार आहोत. त्यामुळे साखर कामगारांनी संघटित व्हायला हवे, अशी अपेक्षा राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे सरचिटणीस शंकरराव भोसले यांनी व्यक्त केली.
राजारामनगर येथे वाळवा तालुका राष्ट्रीय साखर कामगार संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. त्यामध्ये भोसले बोलत होते. अध्यक्षस्थानी कामगार संघाचे अध्यक्ष राजेंद्र चव्हाण होते. यावेळी ४८ सेवानिवृत्त कामगारांचा सन्मान करण्यात आला.
भोसले म्हणाले, फरकातील ५० टक्के रक्कम कामगारांच्या खात्यावर लवकरच वर्ग होईल. कामगारांच्या पगारवाढीचा त्रिपक्षीय करार मार्च २०२४ मध्ये संपत आहे. राजेंद्र चव्हाण यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सुदाम पाटील यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले. सर्व ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. यावेळी तानाजीराव खराडे, विकास पवार, मनोहर सन्मुख, लालासाहेब वाटेगावकर, किरण बाबर, संजय सत्रे, संजय पाटील, संजय शेळके, जयवंत माने, योगेश पवार, संदीप गुरव, सदाशिव पाटील, शिरीष जोशी, सत्यवान मोहिते, रामचंद्र पाटील, जयराम पाटील, बजरंग पाटील, तुकाराम मिसाळ उपस्थित होते.