अहिल्यानगर : अहिल्यानगर विभागातील २६ साखर कारखान्याचा गळीत हंगाम समाप्त झाला आहे. यंदाच्या हंगामात १ कोटी १३ लाख टन उसाचे गाळप झाले असून, १ कोटी ३० हजार ७०२ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. ऊस गाळपात सर्वाधिक १२,३३,२११ टन गाळप करून खासगी असलेल्या इंडिकॉन डेव्हलपर्स (अंबालिका) कारखाना तर सहकारीत संगमनेरच्या स्व. भाऊसाहेब सहकारी साखर कारखान्याने सर्वाधिक ८,१४,२९० टन उसाचे गाळप करून अव्वल क्रमांक मिळवला. साखर कारखान्याचा गाळप हंगाम आटोपला आहे, असे प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयातून सांगण्यात आले.
यंदा गतवर्षीपेक्षा १५ दिवस उशिराने गाळप सुरू झाला तर दरवर्षीपेक्षा पंधरा दिवस आधीच गाळप हंगाम संपला. अहिल्यानगर विभागातील अहिल्यानगर जिल्ह्यात २२ व नाशिक जिल्ह्यात चार साखर कारखान्यांच्या माध्यमातून यंदा उसाचे गाळप सुरू होते. अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यांत यंदा एक कोटी तेरा लाख टन उसाचे गाळप झाले. अहिल्यानगरला ९४,७५० टन तर नाशिकला ९,००० टन अशी विभागात १,११,५०० टन गाळप क्षमता आहे. मात्र, विभागात यंदा बहुतांश वेळा क्षमतेपेक्षा अधिक ऊस गाळप झाले.