सोलापूर : देशांतर्गत बाजारपेठेत मागील तीन महिन्यांमध्ये प्रतिक्विंटल जवळपास ३०० रुपयांनी साखरेचे भाव कमी झाले आहेत. त्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांना मिळणाऱ्या ऊस दरावर होण्याची शक्यता आहे. साखर कारखान्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. त्यामुळे साखरेचा किमान विक्री दर ४० रुपये प्रती किलो करण्याची मागणी भाजप किसान मोर्चाचे प्रदेश महामंत्री संदीप गिड्डे यांनी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चौहान यांना दिले आहे. दुसरीकडे साखर कारखानदार साखर निर्यातीसाठी प्रयत्नशील आहेत. केंद्र सरकारने ४० लाख टन साखर निर्यातीला परवानगी द्यावी अशी मागणी पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार अभिजित पाटील यांनी केली आहे.
केंद्र सरकारने २०१९ पासून साखरेचा किमान विक्री दर ३१०० रुपयांवर स्थिर ठेवला आहे. परंतु सद्यस्थितीमध्ये हा भाव साखर कारखान्यांना परवडणारा नाही. ऊस तोडणी, वाहतुकीच्या दरामध्ये सुमारे ३४ टक्के वाढ झाली आहे. उसाच्या एफआरपीमध्ये गेल्या सहा वर्षात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे साखर विक्रीचा किमान दर प्रती क्विंटल चार हजार रुपये करावा. तरच साखर कारखान्यांना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम देणे शक्य होणार आहे, असेही भाजप किसान मोर्चाचे प्रदेश महामंत्री गिड्डे यांनी निवेदनात म्हटले आहे. तर आमदार अभिजित पाटील यांच्या म्हणण्यानुसार, यावर्षीच्या हंगामात देशात किमान ३२० लाख टन साखर तयार होईल असा अंदाज आहे. गरजेपेक्षा किमान ४० लाख टन साखर शिल्लक राहणार आहे. ही साखर निर्यातीला केंद्र शासनाने परवानगी दिली तर त्याचा फायदा कारखानदारीला होऊ शकेल.