पुणे : सध्या शरयु ऍग्रो इंडस्ट्रीज साखर कारखान्यात को-जन मॅनेजर म्हणून कार्यरत गिरीश कुंडलिक झगडे यांची कार्यकारी संचालक पॅनलमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यात सर्वात कमी वयाचा कार्यकारी संचालक होण्याचा बहुमानही त्यांनी मिळवला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन केले जात आहे. मूळ काझडगाव येथील रहिवासी असलेल्या, शेतकरी कुटूंबात जन्मलेल्या झगडे यांनी मेहनतीचा वारसा आणि शिक्षणाची जिद्द यातून यश मिळवले आहे.
गिरीश झगडे यांच्या वडिलांनी दुसऱ्याच्या शेतात बैलांच्या साहाय्याने ऊस बांधणीचे काम केले. गिरीश यांनीही अभियांत्रिकी शिक्षण घेत असताना सुट्ट्यांमध्ये वडिलांसोबत हीच कामे केली. कठोर मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केले. नंतर बारामती अॅग्रो, निरा-भिमा सहकारी, शरयु ऍग्रो इंडस्ट्रीज, जुबिलंट सायन्स, अंबालिका शुगर, सुभाष शुगर यांसारख्या नामांकित साखर कारखान्यांमध्ये विविध पदांवर काम केले. सध्या ते शरयु ऍग्रो येथे को-जन मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या प्रचंड अभ्यासवृत्ती आणि नवनवीन काहीतरी करण्याच्या जिद्दीमुळेच त्यांना हे यश प्राप्त झाले आहे.