बीड : आई- वडील ऊसतोड मजूर असले तरी मुलाने खाकी वर्दीचे स्वप्न साकार केले आहे. तालुक्यातील राजपिंपरी तांड्यावरील भाऊसाहेब जाधव याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवले. त्याची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे. भाऊसाहेब यांचे आई- वडील ऊसतोड मजूर करतात. गावातील पहिला पोलिस उपनिरीक्षक बनल्याने गावकरी व परिसरातील नागरिकांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या. त्याच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
आई- वडील ऊसतोड मजूर असलेल्या भाऊसाहेब जाधव यांच्या वाट्याला मोठ संघर्ष आला. अर्थाअर्थी कसलाही संबंध नसताना खोट्या गुन्ह्यात नाव टाकले. मुतखड्याच्या ऑपरेशनमुळे फिजिकल परीक्षेत अडथळे आले. अनेक टप्प्यावर संघर्ष करावा लागला. या संघर्षातूनच भाऊसाहेब जाधव यांना जिंकून दाखवण्याचे बळ मिळाले. त्यांचे प्राथमिक शिक्षण मुळशी तांडा येथील जिल्हा परिषद शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण देवपिंपरी व जयभवानी कॉलेज गढी येथे घेतले. पदवी शिक्षण शासकीय अभियांत्रिकी कॉलेज रायगड येथे झाले. इंजिनिअरिंगनंतर चांगला जॉब मिळाला. परंतु आई- वडीलांची इच्छा म्हणून त्याने एमपीएससीची तयारी कली. अनेक वेळा अपयश आले. मात्र, त्याने जिद्दीने यश मिळवले. आई-वडिलांच्या डोळ्यातील आनंदाश्रू पाहून माझ्या कष्टाचे चीज झाले असे भाऊसाहेब जाधव यांनी सांगितले.