मॉरिशसमध्ये ऊस ठरतोय वीज निर्मितीचा स्रोत

पोर्ट लुईस (मॉरिशस) : चीनी मंडी

देशातील प्रमुख नगदी पिक असलेल्या मॉरिशसने आता उसाचा उपयोग वीज निर्मितीसाठी सुरू केला आहे. त्याचा त्यांना फायदाही होताना दिसत असून, देशाच्या एकूण गरजेच्या १४ टक्के वीज उसापासून तयार करण्यात त्यांना यश आले आहे. यामुळे मॉरिशसचे कोळसा आणि तेलावरील अवलंबून राहणे कमी होऊ लागले आहे.

ऊस हे मॉरिशस बेटावरील प्रमुख नगदी पिक. उसाने मॉरिशसच्या कृषि व्यवस्थेला बळकटी दिली. आता तोच ऊस देशाच्या वीज क्षेत्रासाठीही वरदान ठरत आहे. साखरेसाठी ऊस गाळप केल्यानंतर उतरणाऱ्या बगॅसपासून वीज निर्मिती केली जात आहे. या अपारंपरिक ऊर्जास्रोतापासून सध्या देशाच्या एकूण गरजेच्या १४ टक्के वीज तयार होत आहे. पण, येत्या २०२५ पर्यंत देशाच्या गरजेच्या ३५ टक्के वीज अपारंपरिक ऊर्जा स्रोतांपासून तयार केली जाईल. यात सौर ऊर्जा, पवन ऊर्जा आदींचा समावेश असेल. येत्या काळात ३५ टक्के अपारंपरिक ऊर्जा स्रोत उभारणे अवघड नाही, कारण, पुढच्या वर्षीपर्यंत ११ सोलर पार्क आणि किमान दोन पवन ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची माहिती पंतप्रधान इवान कोल्लेनडावेल्लो यांनी दिली.

पंतपर्धान कोल्लेनडावेल्लो म्हणाले, ‘साखर उद्योगातून बगॅसच्या माध्यमातून होणार वीज पुरवठा असाच सुरू राहणार आहे.’ सध्या मॉरिशसमधील ६० टक्के वीज ही चार साखर कंपन्यांकडून तयार केली जाते. या चारही कंपन्यांचे कोळशावर चालणारे थर्मल प्रोजेक्ट आहेत. ऊस हंगाम सुरू झाल्यानंतर या प्रकल्पांमध्ये उसाच्या उप पदार्थांचे काम सुरू होते.

वीज २४ तास

मॉरिशसच्या दक्षिणेला असलेल्या ओमनिकेन कंपनी सध्या पूर्ण क्षमतेने काम करत आहे. ऊस तोडणी मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याने उसाच्या ट्रकच्या रांगा कारखान्याबाहेर दिसत आहेत. तोडणी हंगामात रोज ८ हजार ५०० टन ऊस गाळप करण्याची क्षमता या कारखान्यात असून वर्षाला ९ लाख टन गाळप होते. ऊस गाळपानंतर उसाचे चिपाड वाळवण्यात येते आणि त्यानंतर थर्मल प्रकल्पात ५०० डिग्री सेल्सिअसला जाळले जाते. यातून संबंधित प्रकल्पासाठी आणि देशाच्या ग्रीडसाठी वीज तयार केली जाते.

याबाबत ओमनिकेन कंपनीचे जॅक्स डी युनिवेल्ली म्हणाले, ‘इथे आमच्याकडे २४ तास वीज तयार करणे सुरू असते. पवन किंवा सौर ऊर्जेसारखी वाऱ्याची किंवा सूर्य किरणांची वाट पहावी लागत नाही. तेल आणि कोळशाप्रमाणे बगॅस स्टोअर करण्याची सुविधाही आमच्याकडे आहे.

साखर उद्योगावर संकट

युरोपीयन युनियनने २०१७पासून थायलंड, ब्राझील आणि भारतातील साखरेकडे आपला कल वाढवल्याने मॉरिशमधील साखर उद्योग आणि पर्यायने तेथील ऊस उत्पादक शेतकरी संकटात आला आहे. साखरेचे घसरते दर, स्थानिक साखर उद्योगासाठी धोकादायक आहेत, असे मत  मॉरिशस चेंबर ऑफ कॉमर्सचे सरचिटणीस जॅकलीन सौझिअर यांनी व्यक्त केले.

‘देशात छोट्या शेतकऱ्यांची संख्या २०१६ पासून २०१८पर्यंत २६००० वरून १३ हजारवर घसरली आहे,’ अशी माहिती कृषी मंत्री मेहन कुमार सीरुत्तून यांनी दिली.

आता उसाच्या चिपाडापासून अपारंपरिक ऊर्जा निर्मितीसाठी लागणाऱ्या उसाचे उत्पादन मॉरिशसमध्ये होऊ शकते का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

जॅक्स डी युनिवेल्ली म्हणाले, ‘आमचा देश खूप छोटा आहे. थायलंड, ब्राझील आणि भारताएवढी आमच्यामध्ये क्षमता नाही. पण, आम्ही आमच्या पुरेसे साखर उत्पादन करू शकतो. मुळात आमच्यासारख्या छोट्या देशांनाही साखर निर्यातीची संधी मिळायला हवी कारण आम्ही सर्वांत असुरक्षित आहोत.’

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here